लांजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी पदपथाचा मार्ग मोकळा; १५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन

Gramin Varta
299 Views

लांजा शहर समन्वय समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

लांजा / अरबाज नेवरेकर: लांजा शहर समन्वय समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, लांजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पदपथ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लांजा हायस्कूल ते तहसील कार्यालयाच्या आवारातून गोंडे सखल रोडपर्यंत काँक्रीटचा पदपथ १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या भरावामुळे लांजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला उड्डाणपुलाची भिंत आणि दुसऱ्या बाजूला अरुंद सर्व्हिस रोडवरून अवजड वाहने व अन्य वाहनांची सततची वर्दळ असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
ही बाब गांभीर्याने लक्षात घेत लांजा शहर समन्वय समितीने यापूर्वी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनीकडे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र काँक्रीट पदपथ उभारण्याची मागणी केली होती. मात्र कामाला अपेक्षित गती न मिळाल्याने बुधवारी (५ ऑगस्ट) शहर समन्वय समितीचे पदाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे जागेची पाहणी केली.

यावेळी शहर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेटये यांनी १५ ऑगस्टपूर्वी पदपथाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या कामासाठी आवश्यक समन्वय साधण्याबाबत लांजा तहसीलदार प्रियंका ढोले यांनीही सकारात्मक भूमिका घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. जागेच्या पाहणीवेळी शहर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेटये, शेखर स्वामी, विजय कुरूप, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता श्री. रहाटे तसेच ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक श्री. शितलानी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Total Visitors :
4660387
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *