रायगड : जिल्ह्याच्या रखडलेल्या पालकमंत्रीपदाबाबत पुन्हा एकदा मोठी राजकीय चर्चा रंगली आहे. शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी १५ ऑगस्टपूर्वी मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती होईल, असा ठाम दावा केला आहे.
तसेच या निर्णयाबाबत महायुतीतील मतभेद संपुष्टात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महेंद्र थोरवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महायुतीतील सर्व प्रमुख नेत्यांमध्ये यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनीही भरत गोगावले यांच्या नावाला दुजोरा दिला आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न आता लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर गेल्या दीड वर्षांपासून निर्णय प्रलंबित आहे. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या पदावरून मतभेद उघड झाले होते. मात्र अलीकडील राजकीय घडामोडींनंतर वातावरण बदलल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, मंत्री भरत गोगावले यांनीही यापूर्वी पालकमंत्रीपदाबाबत ग्रीन सिग्नल मिळाल्याचे सूचक वक्तव्य केले होते. आता आमदार महेंद्र थोरवे यांनी १५ ऑगस्टपूर्वीच नियुक्ती होईल असा दावा केल्याने रायगडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी वेग आला आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत नियुक्ती आदेश जारी झालेला नाही. त्यामुळे अंतिम निर्णयाची प्रतीक्षा कायम असून, शासनाच्या अधिकृत घोषणेनंतरच पालकमंत्रीपदाबाबतची स्थिती स्पष्ट होणार आहे.
भरत गोगावले १५ ऑगस्टपूर्वी रायगडचे पालकमंत्री होणार; आमदार महेंद्र थोरवेंचा दावा
Leave a Comment




