चिपळूणमधील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, मात्र अपूर्ण भरावामुळे गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता कमी

Gramin Varta
46 Views

चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात महत्त्वाचा आणि मध्यवर्ती असणाऱ्या चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बहादूरशेख चौक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत उभारण्यात येत असलेल्या या पुलावरील सर्व गर्डर चढविण्याचे काम पूर्ण झाले असून सध्या काँक्रिटीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. बहादूरशेख चौकात गर्डरवर स्लॅब टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून रावतळे ते बहादूरशेख चौक या दरम्यानचे अपूर्ण काम मार्गी लावण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून दिवस-रात्र काम सुरू आहे.

दरम्यान, पुलावरील काँक्रिटीकरणानंतर त्यावर शेवटचा कोट देऊन २१ दिवसांचा क्युरींगचा कालावधी द्यावा लागत असल्याने, तसेच प्रांत कार्यालयाकडील अपूर्ण भरावाचे काम शिल्लक असल्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पुलासाठी प्रांताधिकारी कार्यालयाजवळ सुमारे २० फूट उंचीचा मातीचा भराव करावा लागणार असून सध्या केवळ पाच फुटांचा भराव पूर्ण झाला आहे. उर्वरित भरावाचे काम आणि तांत्रिक प्रक्रिया पाहता नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या कालावधीत हा पूल वाहतुकीस सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बहादूरशेख चौकात उड्डाणपुलाचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला असून चिपळूण-कराड मार्गावरील व कराडकडे जाणारी वाहतूक चौकातून न वळवता पुलाखालून सोडण्यात येत आहे.

Total Visitors :
4662205
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *