देवरूख : हॉकीच्या मैदानावर नाव कमावण्याचं स्वप्न नियतीने हिरावलं; अवघ्या १४ व्या वर्षी मृण्मयीची दुर्धर आजाराशी झुंज संपली

Gramin Varta
308 Views

१२ तासांची शस्त्रक्रिया, दोन वर्षांची मृत्यूशी झुंज अन् अखेर नियतीपुढे पराभव

देवरूख : हॉकीच्या मैदानावर धावून मोठं नाव कमावायचं, आपल्या खेळाच्या जोरावर नावलौकिक मिळवायचा आणि आयुष्यातील मोठी स्वप्नं पूर्ण करायची… अवघ्या १४व्या वर्षी ही स्वप्नं उराशी बाळगणाऱ्या देवरूख बागवाडी येथील मृण्मयी योगेश कुलकर्णी हिची दुर्धर आजाराशी सुरू असलेली दोन वर्षांची झुंज अखेर नियतीपुढे अपयशी ठरली. गुरुवारी रात्री मृण्मयीने अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. तिच्या अकाली निधनाच्या वृत्ताने देवरूख शहरावर शोककळा पसरली असून, अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत.

देवरूख बागवाडी येथील पौरोहित्य करणारे योगेश कुलकर्णी यांची मृण्मयी ही कन्या. लहानपणापासूनच हुशार, मनमिळावू आणि विविध कला-क्रीडा प्रकारांत उत्स्फूर्तपणे सहभागी होणारी मृण्मयी सर्वांची लाडकी होती. देवरूख शाळा क्रमांक ३ मध्ये शिक्षण घेत असताना तिला हॉकीची विशेष आवड निर्माण झाली. हॉकीचा मनापासून सराव करत तिने तालुका तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही सहभाग घेतला होता. भविष्यात हॉकीमध्ये करिअर करून मोठं नाव कमावण्याचं स्वप्न ती पाहत होती.

सातवी इयत्तेत न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख येथे प्रवेश घेतल्यानंतरही तिचा विविध उपक्रमांमधील सहभाग कायम राहिला. चित्रकला, नृत्य, खो-खो यांसारख्या स्पर्धांमध्ये ती उत्साहाने सहभागी होत असे आणि अनेकदा यशही मिळवत असे. अभ्यासातही ती तितकीच हुशार होती. वडील योगेश कुलकर्णी हे त्यांचा मुलगा यश याला पौरोहित्यातील रुद्र शिकवत असताना ऐकून मृण्मयीनेही रुद्र मुखोद्गत केला होता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाशी आपुलकीने वागणाऱ्या मृण्मयीने आपल्या प्रेमळ स्वभावामुळे अल्पावधीतच परिसरातील प्रत्येकाच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.

मात्र मे २०२४ मध्ये तिच्या प्रकृतीत अचानक बिघाड होऊ लागला. पोटदुखी आणि पचनाच्या त्रासाने सुरू झालेल्या या आजाराच्या वैद्यकीय तपासण्यांदरम्यान तिच्या मेंदूमध्ये गाठ असल्याचे निदान झाले. ही गाठ काढण्यासाठीची शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. मात्र परिस्थितीचे गांभीर्य असूनही मृण्मयीने धैर्य सोडले नाही. ‘मला बरे करा, शस्त्रक्रिया करा,’ असा आत्मविश्वास तिने डॉक्टरांना दिला.

डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने तब्बल १२ तासांची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. कमी वयात एवढ्या मोठ्या शस्त्रक्रियेला धैर्याने सामोरे जाणाऱ्या मृण्मयीच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक झाले. या कठीण काळात देवरूख परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनीही पुढाकार घेत तिच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचा हात दिला. नागरिकांच्या आशीर्वादाने आणि उपचारांना मिळालेल्या प्रतिसादामुळे काही महिन्यांतच मृण्मयी पूर्वपदावर आली. ती पुन्हा शाळेत जाऊ लागली, अभ्यास करू लागली आणि आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली.

पण नियतीला मात्र काही वेगळेच मंजूर होते. वर्षभरातच तिला पाठदुखी आणि खांदेदुखीचा त्रास सुरू झाला. आजाराने पुन्हा डोके वर काढले. वैद्यकीय तपासण्यांनंतर मेंदूतील गाठीशी संबंधित कर्करोगजन्य पेशी मणक्यांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृण्मयीवर केमोथेरपी, रेडिएशनसह विविध उपचार सुरू झाले. या संपूर्ण काळात तिच्या मनात एकच ध्यास होता—‘मला बरे व्हायचे आहे.’ डॉक्टरांनी सुचवलेल्या प्रत्येक उपचाराला ती सकारात्मकपणे सामोरी जात होती.

गेल्या दोन महिन्यांपासून मात्र तिची प्रकृती अधिकच खालावत गेली. दुर्धर आजाराने शरीराला झपाटले असतानाही मृण्मयीची जगण्याची इच्छाशक्ती कायम होती. जवळपास दोन वर्षांच्या या संघर्षातील सुमारे एक वर्ष तिने रुग्णालयात उपचार घेत घालवले. या कठीण काळात आई-वडील, काका-काकू, भाऊ आणि चुलत बहिणींनी तिच्या सोबत राहून तिला मानसिक आधार दिला. डॉक्टरही तिच्या जिद्दीचे आणि उपचारांना देत असलेल्या प्रतिसादाचे कौतुक करत होते.

अखेर गुरुवारी रात्री मृण्मयीची ही प्रदीर्घ झुंज थांबली. अवघ्या १४व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. हॉकीच्या मैदानावर चमकण्याची, मोठं नाव कमावण्याची आणि आयुष्यभर जपलेली स्वप्नं पूर्ण करण्याची तिची उमेद काळाच्या पडद्याआड गेली. मृण्मयीच्या निधनाचे वृत्त देवरूखमध्ये पसरताच शहरातील वातावरण सुन्न झाले. तिच्या शाळेतही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मृण्मयीच्या रूपाने एका गुणी, हुशार, खेळाडूवृत्तीच्या आणि मनमिळावू मुलीचा अकाली अंत झाला. तिच्या डोळ्यांत असलेली मोठी स्वप्नं पूर्ण होण्याआधीच काळाने तिच्यावर घाला घातला. तिच्या जाण्याने कुलकर्णी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, देवरूखवासीयांनीही हळहळ व्यक्त केली आहे. मृण्मयीच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका-काकू आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

Total Visitors :
4667712
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *