थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचावासाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार

Gramin Varta
68 Views

प्रशासनाला तातडीने उत्तर; मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन वस्तुस्थिती मांडण्याचा निर्णय

रत्नागिरी / प्रतिनिधी :थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रव्यवहाराला तातडीने उत्तर देण्याबरोबरच मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून संबंधित विभागाचे अधिकारी आणि मंत्र्यांसमोर या प्रकरणाची वस्तुस्थिती मांडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती, रत्नागिरीची कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (८ ऑगस्ट) दुपारी १२.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एल. व्ही. पवार होते. या बैठकीत ज्या धार्मिक संस्थेने जागेची परिपूर्ण प्रस्तावासह मागणी केली आहे, त्या संस्थेला पुढील प्रशासकीय तसेच कायदेशीर पाठपुरावा करण्याचे अधिकार देण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत संघर्ष समिती संबंधित संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रव्यवहाराला तातडीने उत्तर देण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन संबंधित खात्याचे अधिकारी आणि मंत्र्यांना थिबा राजा कालीन बुद्ध विहाराबाबतची वस्तुस्थिती आणि समितीची भूमिका सविस्तरपणे समजावून सांगण्याचे ठरले. हा लढा केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित न ठेवता तालुक्यातील गावागावांत पोहोचवण्याचाही निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या संरक्षणाच्या संघर्षाची ज्योत प्रत्येक गावात प्रज्वलित करण्याचा संकल्प कार्यकारिणीने केला.

बैठकीस कार्याध्यक्ष अनंत सावंत गुरुजी, उपाध्यक्ष प्रकाश यशवंत पवार, सचिव अमोल जाधव, उपसचिव रुपेश कांबळे, सल्लागार सुनील आंबुलकर, शिवराम विठ्ठल कदम, दीपक सिताराम जाधव, प्रदीप भिकाजी पवार, दिवेन अनंत कांबळे, रत्नदीप कांबळे, केतन गणपत पवार, राहुल पवार, सुनील पवार, अनंत पवार, राजन जाधव, राजेंद्र कांबळे, अजित जाधव, विजय मोहिते यांच्यासह संघर्ष समितीचे बहुसंख्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

Total Visitors :
4668304
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *