मुंबई : बस्तरच्या निसर्गरम्य वाटा अनुभवण्यासाठी बाईकवरून निघालेल्या मुंबईतील २४ वर्षीय तरुणीचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कांदिवली पश्चिम येथील रिद्धी ठक्कर ही आपल्या २३ जणांच्या रायडिंग ग्रुपसोबत छत्तीसगडमधील बस्तरच्या दिशेने निघाली होती. मात्र, हा प्रवास तिच्या आयुष्यातील अखेरचा प्रवास ठरला. धमतरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वरील मरकाटोला घाटाजवळ भरधाव ट्रेलरने तिच्या दुचाकीला दिलेल्या धडकेत रिद्धीचा मृत्यू झाला.
बुधवारी पहाटे सुमारे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान रायडिंग ग्रुपमधील बहुतांश सदस्य पुढे निघून गेले होते. रिद्धी आणि तिचे काही साथीदार मागे होते. याचदरम्यान मरकाटोला घाट परिसरात रिद्धीच्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत रिद्धी रस्त्यावर फेकली गेली आणि गंभीर जखमी झाली. तिच्या ताब्यातील दुचाकीचा क्रमांक MH 13 SP 0835 असल्याची माहिती आहे.
अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत रिद्धीला चारामा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला धमतरी येथील श्रीराम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर ट्रेलर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रेलरचा आणि त्याच्या चालकाचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून वाहनाची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
विशेष म्हणजे, अपघाताच्या अवघ्या १५ तासांपूर्वी रिद्धीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर’ असा संदेश शेअर केला होता. बस्तरचा प्रवास, नवीन ठिकाणांचा अनुभव आणि बाईक रायडिंगचा उत्साह या पोस्टमधून दिसत होता. मात्र, काही तासांतच ती पोस्ट तिच्या आयुष्यातील अखेरची सोशल मीडिया पोस्ट ठरेल, याची कल्पनाही तिच्या मित्र-मैत्रिणींना नव्हती.
रिद्धी केवळ बाईक रायडर नव्हती, तर ती एक उत्तम मेकअप आर्टिस्ट म्हणूनही कार्यरत होती. गेल्या तीन वर्षांपासून ती बाईक रायडिंग करत होती. नुकतेच कझाकिस्तान येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप मेकअप स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे तिच्या अकाली निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि रायडिंग ग्रुपवर शोककळा पसरली आहे.
बस्तरच्या दिशेने सुरू झालेला उत्साहाचा प्रवास एका क्षणात काळजाला चटका लावणाऱ्या दुःखद घटनेत बदलला. ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर’ म्हणत निघालेल्या रिद्धीची ती पोस्ट आता तिच्या आठवणींची अखेरची खूण ठरली आहे. या दुर्घटनेने महामार्गावरील वेगवान वाहनांपासून दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
‘लेट्स एक्सप्लोर बस्तर!’ म्हणत निघाली अन् प्रवास ठरला अखेरचा; मुंबईच्या २४ वर्षीय बाईक रायडरचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
Leave a Comment






