रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील गंजलेले व धोकादायक विद्युत खांब तातडीने बदलण्यात यावेत आणि वीज पुरवठा खंडित असतानाही येणाऱ्या तफावतयुक्त वीज बिलांची चौकशी व्हावी, या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब गंजले असून ते पडझड होण्याच्या स्थितीत आहेत, ज्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने स्वतःच्या यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील अशा सर्व खांबांचा सर्व्हे आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून ते तात्काळ बदलण्याची कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, वीज पुरवठा बंद असतानाही ग्राहकांना भरमसाठ व तफावत असणारी बिले येत असल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, या सदोष बिलिंग पद्धतीची सखोल चौकशी करून ग्राहकांना तातडीने दिलासा देण्यात यावा, असा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला. बहुजन समाज पार्टीच्या वतीने मांडण्यात आलेल्या या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यातील तिन्ही कार्यकारी अभियंत्यांना यासंदर्भात त्वरित सूचित करून सर्व्हे व आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन यावेळी दिले.
हे निवेदन सादर करताना बहुजन समाज पार्टीचे रत्नागिरी विधानसभा प्रभारी किशोर पवार, रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा उपाध्यक्ष अनंत पवार, ॲड. प्रवीण कांबळे, तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी अनिकेत पवार हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.





