रत्नागिरी : रत्नागिरी शहरातून आजूबाजूच्या ग्रामीण भागात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना एसटी बससेवेमुळे होणाऱ्या विविध गैरसोयींची गंभीर दखल घेत भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडलाच्या वतीने एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले आहे. भाजपा शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभाग नियंत्रकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
शहरातील अनेक शाळा सायंकाळी साडेपाच वाजता सुटतात; परंतु आजूबाजूच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक एसटी बसेस त्यापूर्वीच साधारण पाच वाजण्याच्या सुमारास निघून जातात.
यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील बसची वाट पाहत तासन्तास थांबावे लागते आणि विद्यार्थी व पालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. याशिवाय बस रिकामी असतानाही काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बस न थांबवणे, बसमध्ये चढताना-उतरताना पुरेसा वेळ न देणे आणि काही वेळा या बसमध्ये पास चालत नाही असे सांगून विद्यार्थ्यांना त्रस्त करण्याचे प्रकार घडत आहेत. परीक्षा कालावधीतही विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने विभाग नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिला.
एसटी बसचे चालक किंवा वाहक यांच्याकडून विद्यार्थ्यांशी गैरवर्तन, अरेरावी किंवा नियमबाह्य पद्धतीने वागणूक दिली जात असल्यास त्याची तातडीने दखल घ्यावी, अशी आक्रमक मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर, चालक अथवा वाहकांकडून विद्यार्थ्यांशी गैरवर्तन झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन विभाग नियंत्रकांनी भाजपा शिष्टमंडळाला दिले. काही बसफेऱ्यांमध्ये कमी प्रवासी असतानाही बसेस धावत असल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. विद्यार्थ्यांची संख्या आणि शाळांच्या वेळांचा योग्य मेळ घालून बससेवेचे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल आणि महामंडळालाही अधिक प्रवासी मिळतील, असा सूर यावेळी लावला गेला.
सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत आजूबाजूच्या ग्रामीण भागांसाठी जादा एसटी फेऱ्या सोडाव्यात, शालेय विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन बसफेऱ्यांचे योग्य नियोजन करावे, या भाजपाच्या प्रमुख मागण्या आहेत. विभाग नियंत्रकांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत विद्यार्थ्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असून, या प्रश्नाचा पुढील पाठपुरावा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वेळेला, सुरक्षित प्रवासाला आणि त्यांच्या सन्मानाला प्राधान्य देऊन एसटी प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी तीव्र अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त होत आहे.




