गुहागर समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोन पर्यटकांना जीवरक्षकांनी दिले जीवदान

Gramin Varta
277 Views

गुहागर : १५ ऑगस्टच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गुहागर समुद्रकिनारी आलेल्या दोन पर्यटकांचा जीव जीवरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वाचला. चिपळूण येथील गफ्फार भट आणि झारखंड येथील हिरालाल कर्मली अशी बुडता बुडता वाचलेल्या पर्यटकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टच्या सुट्टीचे औचित्य साधून आठ जणांचा एक गट गुहागर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आला होता. समुद्रस्नानाचा आनंद घेत असताना यातील गफ्फार भट आणि हिरालाल कर्मली हे दोघे पोहताना खोल समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. समुद्राच्या लाटा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडण्याच्या स्थितीत पोहोचले.

दरम्यान, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनारी तैनात असलेले गुहागर नगरपंचायतीचे जीवरक्षक प्रदेश तांडेल आणि साहिल तोडणकर यांच्या निदर्शनास ही बाब आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही जीवरक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात झेप घेतली.

सुरू असलेला पाऊस आणि समुद्राच्या वाढत्या लाटांची तमा न बाळगता जीवरक्षकांनी खोल पाण्यात बुडत असलेल्या दोन्ही पर्यटकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. त्यांच्या तत्परतेमुळे दोन पर्यटकांचे प्राण वाचले.

या घटनेत जीवरक्षकांनी दाखवलेले धाडस, प्रसंगावधान आणि कर्तव्यतत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. समुद्रकिनारी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी समुद्राची स्थिती लक्षात घेऊन जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Total Visitors :
4710653
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *