गुहागरातील बुधल समुद्रकिनाऱ्यावर दोन मृतदेह सापडल्याने खळबळ; दोघेही चिपळूणचे?

Gramin Varta
1057 Views

गुहागर : गुहागर तालुक्यातील बुधल समुद्रकिनाऱ्यावर दोन मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघांचा समुद्राच्या पाण्यात वाहून जाऊन बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे चिपळूणसह गुहागर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृत्यू झालेल्या दोघांचा संबंध चिपळूणमधील गोवळकोट परिसराशी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही बुधल बीचवरील खडकाळ भागात किंवा समुद्रकिनारी मासेमारीसाठी गेले होते. समुद्राला आलेल्या लाटांचा वेग आणि पाण्याची खोली यांचा अंदाज न आल्याने ते पाण्यात वाहून गेले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, बुधल गावातील ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी विलंब न करता घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. तसेच पोलिस आणि संबंधित प्रशासनाशी संपर्क साधत तातडीने मदतकार्य व पुढील कार्यवाहीसाठी यंत्रणा घटनास्थळी बोलावून घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. मृतांची ओळख आणि या दुर्घटनेमागील नेमकी परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

समुद्रकिनारी मासेमारी करताना समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्याने दोन जणांचा जीव गेल्याने या घटनेने समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही क्षणांचा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो, याची भीषण जाणीव करून देणाऱ्या या घटनेने चिपळूण आणि गुहागर परिसरावर शोककळा पसरली आहे.

Total Visitors :
4717940
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *