गणपतीपुळे / वैभव पवार : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळ्यापासून अवघ्या १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणसे गावातील हटवाडी येथील सोमनदीवरील ‘स्विमिंग पिकनिक पॉईंट’ सध्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून धामणसे ग्रामपंचायतीने नदीतील तीन अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यांवर विद्युत रोषणाईच्या माध्यमातून तिरंग्याचे रंगीत प्रतिबिंब साकारले. नदीच्या पाण्यावर उमटलेला हा तिरंग्याचा नयनरम्य नजराणा पाहून पर्यटक भारावून गेले.
१४ ते १७ ऑगस्टदरम्यान संध्याकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत हा विद्युत रोषणाईचा आकर्षक देखावा पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात आला होता. पुलावरून करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे नदीतील तीन अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यांवर केशरी, पांढरा आणि हिरवा अशा तिरंग्याच्या तीन रंगांचे प्रतिबिंब पडत होते. पाण्यावर उमटणारे हे रंग आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर यामुळे संपूर्ण ठिकाणाला आगळेवेगळे सौंदर्य प्राप्त झाले होते. अनेक पर्यटकांनी हा क्षण मोबाईल आणि कॅमेऱ्यात कैद केला.
धामणसे ग्रामपंचायतीने पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला. मात्र, यावेळी नदीमध्ये पोहण्यास पर्यटकांना प्रतिबंध करण्यात आला होता. परिसराचे सौंदर्य अनुभवण्यासोबतच तिरंग्याच्या आकर्षक रोषणाईचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत होती.
हटवाडी येथे ओरीतून धामणसेकडे येणाऱ्या मोठ्या नदीवरील पुलासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नदीमध्ये तीन अर्धवर्तुळाकार बंधारे तयार करण्यात आले. या बंधाऱ्यांवरून पाणी खाली पडत असल्याने पांढरे शुभ्र फेसाळणारे पाणी तयार होते. हे दृश्य पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. नदीचा परिसर, आजूबाजूची शेती, शांत वातावरण आणि निसर्गरम्य दृश्ये यामुळे पर्यटक येथे वेळ घालवण्यासाठी येत आहेत. नदी परिसरातील पाण्याचा प्रवाह सध्या कमी असल्याने आणि परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला असल्याने या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत आहे.
या स्विमिंग पिकनिक पॉईंटची माहिती सोशल मीडिया, रिल स्टार आणि विविध माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने आता दूरवरूनही पर्यटक येथे येऊ लागले आहेत. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीचा फायदा स्थानिक बचत गटांच्या महिलांनाही होत आहे. महिलांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू केले असून पर्यटकांना खास कोकणी खाद्यपदार्थांची चव चाखता येत आहे. त्यामुळे पर्यटनासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ लागल्या आहेत.
या नदी परिसराच्या विकासासाठी आमदार भैया सामंत यांनी विशेष सूचना केल्या असून पुढील वर्षी संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करून तो पर्यटकांसाठी अधिक विकसित स्वरूपात खुला करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून नदीतील गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध झाला. नदीतील गाळ काढण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन धामणसे ग्रामपंचायतीने नदी परिसरात विशेष सूचनाफलक लावले आहेत. हटवाडीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाहनांची तपासणी करून पर्यटकांची नोंदणी केली जात आहे. शनिवार आणि रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले जात आहेत. पुरुष आणि महिला पोलीस कर्मचारी पर्यटकांना आवश्यक सूचना देत गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत आहेत.
निसर्गाचा आणि पोहण्याचा आनंद घेताना पर्यटकांनी कोणताही अनुचित प्रकार करू नये, मद्यपान करू नये, प्लास्टिकचा कचरा परिसरात टाकू नये तसेच कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन धामणसेचे सरपंच अमर रहाटे यांनी केले आहे.
धामणसे हटवाडी येथील तीन अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यांमुळे या परिसराला पर्यटनाच्या नकाशावर नवी ओळख मिळू लागली आहे. ग्रामपंचायतीकडून करण्यात येत असलेल्या नियोजनबद्ध उपाययोजना, स्थानिक महिलांना मिळणारा रोजगार आणि सोशल मीडियामुळे वाढलेली प्रसिद्धी यामुळे येत्या काळात धामणसे हे रत्नागिरीतील आणखी एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
धामणसे हटवाडीचा ‘स्विमिंग पिकनिक पॉईंट’ पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; नदीतील तिरंग्याचे मनमोहक प्रतिबिंब पाहून पर्यटक भारावले
Leave a Comment





