नवी दिल्ली : शिक्षणानंतर रोजगार मिळवण्याच्या संधी आणि तरुणांची नोकरीसाठीची तयारी हा देशभरातील चर्चेचा विषय बनला असताना ‘इंडिया स्किल रिपोर्ट २०२६’मधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्वाधिक रोजगारक्षम राज्यांच्या क्रमवारीत उत्तर प्रदेशाने अव्वल स्थान पटकावले असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्नाटक, केरळ आणि दिल्ली यांचा पहिल्या पाचमध्ये समावेश आहे.
‘इंडिया स्किल रिपोर्ट २०२६’नुसार उत्तर प्रदेशातील तरुणांची रोजगारक्षमता ७८.६४ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्राची रोजगारक्षमता ७५.४२ टक्के, कर्नाटकची ७३.८५ टक्के, केरळची ७२.१६ टक्के, तर दिल्लीची ७१.२५ टक्के आहे. त्यामुळे रोजगारक्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेश पुढे असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
मात्र, या क्रमवारीचा अर्थ संबंधित राज्यात सर्वाधिक नोकऱ्या उपलब्ध आहेत, असा होत नाही. राज्यातील तरुण उमेदवार नोकरीसाठी किती तयार आहेत आणि त्यांच्याकडे आवश्यक कौशल्ये कितपत आहेत, हे रोजगारक्षमता निर्देशांकातून दर्शवले जाते. त्यामुळे ही क्रमवारी उपलब्ध रोजगाराच्या संख्येपेक्षा उमेदवारांची रोजगारासाठीची तयारी अधोरेखित करते.
अहवालानुसार भारताची एकूण सरासरी रोजगारक्षमता ५६.३५ टक्क्यांवर पोहोचली आहे. २०२५ मध्ये हीच सरासरी ५४.८१ टक्के होती. ‘ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी टेस्ट’ दिलेल्या १ लाखांहून अधिक उमेदवारांची माहिती तसेच सात उद्योग क्षेत्रांकडून मिळालेल्या प्रतिसादांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
वयोगटानुसार पाहता २२ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये सर्वाधिक ७५.७ टक्के रोजगारक्षमता नोंदवली गेली आहे. २६ ते २९ वर्षे वयोगटातील तरुणांची रोजगारक्षमता ७१.७९ टक्के, तर १८ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांची रोजगारक्षमता ७१.३८ टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तंत्रज्ञानाशी संबंधित शिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगाराच्या बाजारपेठेत अधिक मागणी असल्याचेही या अहवालातून दिसून आले आहे. संगणक विज्ञान पदवीधरांची रोजगारक्षमता ८० टक्के असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवीधरांची रोजगारक्षमता ७८ टक्के आहे. त्याखालोखाल इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी ७७ टक्के, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी ७५ टक्के आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी ६३ टक्के रोजगारक्षमता नोंदवण्यात आली आहे.
दरम्यान, एआय, डेटा ॲनालिटिक्स, क्लाउड कम्प्युटिंग आणि सायबरसुरक्षा यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्यांना रोजगार बाजारात वाढती मागणी असल्याचेही अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे बदलत्या रोजगार बाजारपेठेत पारंपरिक शिक्षणासोबतच डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित कौशल्ये आत्मसात करणे तरुणांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
रोजगारक्षमतेत महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेश पुढे? ‘इंडिया स्किल रिपोर्ट’मधून धक्कादायक आकडे समोर
Leave a Comment





