सावर्डेत विद्यार्थिनी बेपत्ता प्रकरणाने खळबळ; आरोपींच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यावर धडक

Gramin Varta
860 Views

हिंदू संमेलन समिती आणि शिवप्रतिष्ठान संस्था आक्रमक

सावर्डे / प्रतिनिधी : चिपळूण तालुक्यातील शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावर्डे येथे वैद्यकीय शिक्षणासाठी आलेली एक तरुणी काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका तरुणाने सहकाऱ्यांच्या मदतीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेला आठ दिवस उलटूनही तरुणीचा ठावठिकाणा लागला नसल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणातील संबंधित व्यक्तींवर तातडीने कारवाई करून बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध घ्यावा, या मागणीसाठी हिंदू संमेलन समिती आणि शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्था, सावर्डे यांच्या वतीने सुमारे ५० कार्यकर्ते व सभासदांनी सावर्डे पोलीस ठाण्यात धडक देत सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले.

या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, तसेच सावर्डे येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष केतन पवार यांनी या प्रकरणात पोलिसांनी तपासाला वेग देण्याची मागणी केली.

सावर्डे हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने विविध जिल्ह्यांसह परराज्यांतूनही विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. अशा परिस्थितीत विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी भूमिका निवेदन देणाऱ्यांनी मांडली. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत निर्माण होणाऱ्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रासह स्थानिक व्यापारावरही होऊ शकतो, अशी चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला असून प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. विद्यार्थिनीचा शोध आणि घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सावर्डे परिसरात अफवा पसरवू नयेत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Total Visitors :
4730133
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *