मालगुंड येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण उत्साहात संपन्न; आरोग्य कर्मचाऱ्यांना १३ महत्त्वाच्या सेवांचे मार्गदर्शन

Gramin Varta
46 Views

मालगुंड: ग्रामीण भागातील नागरिकांना तळागाळापर्यंत गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने, मालगुंड येथे ‘सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा’ (सीपीएचसी) प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्हा परिषद, जिल्हा प्रशिक्षण केंद्र तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण शिबिरादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य स्तरावर द्यावयाच्या १३ प्रमुख आरोग्य सेवांविषयी सविस्तर आणि तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने गर्भधारणा, प्रसूती व प्रसूतीनंतरची काळजी, नवजात बालकांचे संगोपन, किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, डोळे, कान व मुखारोग्य, वृद्धापकाळातील शुश्रूषा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मानसिक स्वास्थ्य तसेच योग आणि आयुष उपचार पद्धतींचा समावेश होता. या मार्गदर्शनामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कौशल्य अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शितल सूर्यवंशी आणि जिल्हा नोडल अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी, पंचायत समिती सदस्या पूर्वा दुर्गवळी, सरपंच श्वेता खेऊर, डॉ. शरण काठोळे, डॉ. सुनीता पवार, डॉ. नगमा गलबले, मुख्याध्यापक बिपीन परकर, प्रमोद लिंगायत, वीणा शिरगांवकर, साधना झोरे यांच्यासह आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी केले. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झाले.

- Advertisement -
Total Visitors :
4730133
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *