रक्षाबंधनानिमित्त माहेरी जाणाऱ्या प्रवाशांचा आणि लाडक्या बहिणींसाठी रत्नागिरीतून ३० ते ३५ जादा बसेसचे नियोजन

Gramin Varta
79 Views

रत्नागिरी: रक्षाबंधनानिमित्त माहेरी जाणाऱ्या प्रवाशांचा आणि लाडक्या बहिणींचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (MSRTC) रत्नागिरी विभाग विशेष सज्ज झाला आहे. सलग सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता, २८, २९ आणि ३० ऑगस्ट दरम्यान रत्नागिरी विभागातून तब्बल ३० ते ३५ जादा एसटी बसेस सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

यंदा २९ ऑगस्ट आणि ३० ऑगस्ट रोजी सलग सुट्ट्या आल्याने एसटी बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ही बाब ओळखून एसटी महामंडळाने आगाऊ तयारी पूर्ण केली असून प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तिकीट बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतून जिल्ह्यातील विविध ग्रामीण मार्गांवर तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि विदर्भ यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांची गर्दी वाढल्यास गरजेनुसार आणखी फेऱ्या वाढवल्या जातील, अशी माहिती रत्नागिरी एसटी विभागाचे विभाग नियंत्रक आश्वजित जानराव यांनी दिली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी एसटी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Total Visitors :
4732218
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *