लांजा उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली; वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना मोठा दिलासा

Gramin Varta
983 Views

लांजा/अरबाज नेवरेकर : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाची एक लेन गुरुवारी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यामुळे लांजा शहरातून जाणाऱ्या वाहनांची कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, गेल्या काही काळापासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने उड्डाणपुलाचे काम महत्त्वाचे मानले जात आहे. उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी आमदार किरण भैय्या सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर कामाला गती मिळाली असून, त्याचाच एक भाग म्हणून उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

दरम्यान, उड्डाणपुलाचे उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेकडून कार्यवाही सुरू आहे. संपूर्ण पूल कार्यान्वित झाल्यानंतर लांजा शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

एक लेन वाहतुकीसाठी खुली करताना नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद (बाबा) लांजेकर, पोलीस उपनिरीक्षक आमोद सरंगले, शहर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, ईगल इन्फ्रा कंपनीचे नरेश शितलानी, शेखर स्वामी, अकबर नाईक, नगरसेविका निधी गुरव, स्वरूप गुरव, राजू राणे, बाबा भिंगार्डे, शिवप्पा उकली आदी उपस्थित होते.

उड्डाणपुलाची एक लेन सुरू झाल्याने लांजा शहरातून होणारी वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून, विशेषतः मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना कोंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

यावेळी नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद (बाबा) लांजेकर तसेच लांजा शहर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किरण भैय्या सामंत, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Total Visitors :
4731988
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *