गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या तन्वी सुतारची ‘डेटा एनालिस्ट’ म्हणून निवड

Gramin Varta
106 Views

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थिनी कु. तन्वी चंद्रकांत सुतार हिची भारतातील नामांकित संशोधन संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), हैदराबाद येथे ‘डेटा एनालिस्ट’ म्हणून निवड झाली आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन ग्रँट अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली असून, तन्वीच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.

टीआयएफआरकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत नियुक्तीपत्रानुसार तन्वी सुतार हिची ‘डेटा एनालिस्ट’ म्हणून निवड करण्यात आली आहे. तिचे कार्यस्थळ बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डेरवण, ता. चिपळूण येथे असणार आहे.

डेटा विश्लेषण, संगणकशास्त्र आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये कौशल्य विकसित केलेल्या तन्वीला देशातील अग्रगण्य संशोधन संस्थेशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तिच्या शैक्षणिक ज्ञानाला प्रत्यक्ष संशोधन क्षेत्राचा अनुभव मिळणार असून, ही निवड संगणकशास्त्र व डेटा सायन्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

तन्वी सुतार हिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे, आय.टी.-सी.एस. समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे तसेच विभागातील प्राध्यापकवर्गाने तिचे अभिनंदन केले. तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छाही व्यक्त करण्यात आल्या.

तन्वीच्या या यशामुळे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधन, डेटा सायन्स आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नव्या संधींची प्रेरणा मिळाली आहे.

Total Visitors :
4731952
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *