गणरायाच्या आगमनाची चाहूल; लांज्यात मूर्तिकारांच्या हातांनी घेतली गती

Gramin Varta
158 Views

लांजा/अरबाज नेवरेकर : गणेशोत्सवाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने लांजा शहर आणि परिसरातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये सध्या लगबग वाढली आहे. गणरायाच्या विविध रूपांना आकार देण्यासाठी मूर्तिकार अहोरात्र परिश्रम घेत असून, कार्यशाळांमध्ये भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.

गणेशमूर्ती घडविण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, मातीपासून मूर्ती तयार करण्यापासून तिचे सुकवणे, रंगकाम आणि सजावटीपर्यंतची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. घरगुती गणपतींपासून सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तींपर्यंत विविध आकारांच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत.

प्रत्येक मूर्ती अधिक आकर्षक आणि सुबक दिसावी, यासाठी मूर्तिकार बारकाव्यांकडे विशेष लक्ष देत आहेत. मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव, मुकुट, दागिने, वस्त्रांची रचना आणि रंगसंगती यावर काळजीपूर्वक काम केले जात आहे. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर आकार घेणारा गणरायाचा हा रूप पाहण्यासाठीही नागरिकांकडून उत्सुकता व्यक्त होत आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही घरांची साफसफाई, सजावट आणि पूजेच्या साहित्याची तयारी सुरू केली आहे. बाजारपेठेतही गणेशोत्सवाशी संबंधित साहित्याची खरेदी-विक्री वाढू लागली आहे. त्यामुळे लांजा शहर आणि परिसरात गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागली असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषासाठी वातावरण सज्ज होत आहे.

Total Visitors :
4745613
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *