नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांच्या माध्यमातून श्रावणी सोमवारनिमित्त उपक्रम
चिपळूण : श्रावणी सोमवारचे औचित्य साधून चिपळूण शहरातील नागरिकांना श्री क्षेत्र मार्लेश्वराचे दर्शन घेता यावे, यासाठी नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांच्या माध्यमातून सोमवारी (२४ ऑगस्ट) विशेष दर्शनयात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरातील विविध भागांतील जवळपास ९०० भाविकांसाठी तब्बल ३१ बसची व्यवस्था करण्यात आली होती.
या दर्शनयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्व ३१ बस नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांच्या माऊली कार्यालयाच्या ठिकाणी एकत्रित करण्यात आल्या. यावेळी भाविकांसाठी अल्पोपहार आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.
महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बसचे श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. ‘हर हर महादेव’ आणि ‘जय मार्लेश्वर’च्या जयघोषात सर्व बस श्री क्षेत्र मार्लेश्वरच्या दिशेने रवाना झाल्या. त्यामुळे माऊली कार्यालय परिसरासह संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
श्रावण महिन्यात मार्लेश्वर दर्शनाची अनेक भाविकांची इच्छा असते. मात्र प्रवासाची अडचण लक्षात घेऊन सामूहिक दर्शनयात्रेचे नियोजन करण्यात आले. शहरातील विविध भागांतील नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेतल्याने सामाजिक एकोपा आणि भक्तिभावाचे दर्शन घडले.
या उपक्रमाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांचे आभार मानले. कुटुंबासह मार्लेश्वर दर्शनाचा लाभ घेता आल्याने अनेक भाविकांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख रश्मीताई गोखले, चिपळूण शहर महिला आघाडी प्रमुख प्राजक्ता टकले, बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेवक उदय जुवळे, गणेश आग्रे, नगरसेविका राणी महाडिक, नीलम जाधव, शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण, युवासेना शहर अधिकारी विनोद पिल्ले यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रावणी सोमवारनिमित्त ३१ बसमधून जवळपास ९०० भाविकांना मार्लेश्वर दर्शनाची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम चिपळूण शहरात विशेष ठरला.
९०० भाविकांना मार्लेश्वर दर्शनाचा योग; ३१ बसमधून भक्तिमय यात्रा
Leave a Comment



