दापोली : श्रावणातील पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांना आधुनिक व्यासपीठ देत दापोली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मंगळागौर स्पर्धेत ‘मैत्री ग्रुप’ने प्रथम क्रमांक पटकावला. सलग आठ तास रंगलेल्या या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील तब्बल २० महिला समूहांनी सहभाग घेतल्याने दापोलीत मंगळागौरीचा उत्साह अक्षरशः शिगेला पोहोचला.
अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत ‘मैत्री ग्रुप’ने प्रथम क्रमांक मिळवत ३५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह पटकावले. ‘झिम्मा क्वीन’ समूहाने द्वितीय क्रमांक मिळवत २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह, तर ‘काळकाई ग्रुप’ने तृतीय क्रमांक मिळवत १५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह मिळवले.
स्पर्धेच्या परीक्षणासाठी ग्रामीण लोकजीवन, लोकगीत आणि लोकनृत्याच्या अभ्यासक श्रावण (दिवेआगर) येथील वर्षा भट आणि रत्नागिरी येथील अर्चना जोशी यांची परीक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. परीक्षकांनी मंगळागौर खेळांची परंपरा, त्यांचे सामाजिक व धार्मिक महत्त्व तसेच खेळ आणि नृत्य यातील फरक यांचा विचार करून विविध निकषांच्या आधारे परीक्षण केले.
दापोलीतील एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंत्री योगेश कदम यांनी या स्पर्धेला थोडा वेळ उपस्थित राहून सहभागी महिलांना शुभेच्छा दिल्या. जुनी लोकपरंपरा जपून ठेवण्याच्या महिलांच्या प्रयत्नांचे त्यांनी अभिनंदन केले. त्यांच्या उपस्थितीने महिला वर्गाचा उत्साह आणखी वाढला.
स्पर्धेच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या श्रेया योगेश कदम यांनी उपस्थित महिलांसोबत मंगळागौर खेळाचा ठेका धरला. स्पर्धेच्या आयोजनासाठी शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेचे विशेष आभार मानत भविष्यातही असे सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. दापोलीतील नाट्यगृहासाठी शासनाने मंजूर केलेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री योगेश कदम यांचे आभार मानत पुढील वर्षी मंगळागौर स्पर्धा दापोलीच्या हक्काच्या वातानुकूलित नाट्यगृहात आयोजित करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात दापोलीतील सांस्कृतिक उपक्रमांना आणखी मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा कृपा घाग, महिला आघाडी प्रमुख दीप्ती निखार्गे, माजी जि.प. अध्यक्षा रोहिणी दळवी, माजी समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, पं.स. सदस्य ममता शिंदे, रसिका पेठकर, कीर्ती परांजपे, रिया सावंत यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवती सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखी शरद यांनी केले.
मंगळागौर ही केवळ पारंपरिक खेळांची स्पर्धा नसून महिलांच्या कलागुणांना वाव देणारी, परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालणारी तसेच महिला एकजुटीला बळ देणारी सांस्कृतिक चळवळ असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
दापोलीत मंगळागौर स्पर्धेत ‘मैत्री ग्रुप’चा डंका; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Leave a Comment






