रत्नागिरी एसटी विभाग ९.३२ कोटींच्या तोट्यात; प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळल्याने चिंता

Gramin Varta
70 Views

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आर्थिक स्थितीसमोर पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे राहिले आहे. जुलै महिन्यात राज्यातील अनेक एसटी विभागांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले असून, रत्नागिरी विभागाची तब्बल ९.३२ कोटी रुपयांची तूट नोंदवली गेली आहे. तोट्याच्या बाबतीत रत्नागिरी विभाग राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याने एसटीच्या स्थानिक कारभाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

जुलै महिन्यात नाशिक विभाग सर्वाधिक तोट्यात असल्याचे समोर आले असून, त्यापाठोपाठ कोल्हापूर, सातारा आणि सांगली विभागांचाही मोठ्या आर्थिक नुकसानीत समावेश आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी विभागातील एसटी सेवेची सद्यस्थिती आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी याकडे लक्ष वेधले जात आहे.

रत्नागिरी विभागातील अनेक एसटी बसेस कालबाह्य झाल्याने भंगारात काढण्यात आल्या आहेत. काही नवीन बसेस दाखल झाल्या असल्या तरी उपलब्ध ताफा प्रवाशांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी अपुरा ठरत आहे. त्यातच चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांसह विविध पदे रिक्त असल्याने वाहतूक व्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. परिणामी अनेक मार्गांवरील बसफेऱ्या विस्कळीत होतात, बसेस वेळेवर उपलब्ध होत नाहीत आणि प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते.

एसटी सेवेतील या अडचणींचा परिणाम प्रवाशांच्या संख्येवरही होत असल्याचे चित्र आहे. वेळेवर बस उपलब्ध न झाल्याने काही प्रवासी वडाप, मिनीबस तसेच खासगी चारचाकी वाहनांचा पर्याय स्वीकारत आहेत. त्यामुळे एकीकडे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत असताना दुसरीकडे खासगी वाहतुकीवरील प्रवाशांचा वाढता कल ही महामंडळासाठी चिंतेची बाब ठरत आहे.

रत्नागिरी विभागाला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वाहतूक नियोजनात बदल करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. शहरी भागातील बससेवा नगरपरिषदांकडे वर्ग करून एसटीने ग्रामीण भागातील सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन बसेसची उपलब्धता वाढविण्यासोबतच चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. ई-बसेसचा ताफ्यात समावेश झाल्यास त्याचाही विभागाला फायदा होऊ शकतो.

प्रवाशांची जास्त गर्दी असलेल्या मार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्या वाढविणे, बस वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन करणे आणि प्रवाशांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करणे आवश्यक आहे. बस निर्धारित थांब्यावर वेळेत पोहोचल्यास प्रवाशांचा एसटीवरील विश्वास पुन्हा वाढू शकतो. योग्य नियोजन, पुरेसा बस ताफा आणि मनुष्यबळाची उपलब्धता या माध्यमातून रत्नागिरी विभागाचा तोटा टप्प्याटप्प्याने कमी करून एसटीची सेवा पुन्हा सक्षम करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4767263
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *