पुणे: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे फिल्मी स्टाइल पाठलागानंतर जेरबंद

Gramin Varta
68 Views

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीची दारू सेवन केल्याने झालेल्या मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे याला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांच्या ऊरळी कांचन पोलिसांनी थरारक पाठलाग करून ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यापासून फरार असलेला लोंढे गेल्या मे महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता.

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात २६ ते २८ मेदरम्यान दापोडी तसेच हडपसर भागात विषारी गावठी दारू सेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या गंभीर प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू असून, आतापर्यंत १० ते १२ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी सुमारे २० जण सहभागी असल्याचा संशय असून, त्यांचा शोध घेण्यासाठी सीआयडीची विविध पथके कार्यरत आहेत.

तपासादरम्यान आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेले मोबाइल फोन तसेच अन्य तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, मुख्य आरोपी बाळू लोंढे फरार असल्याने सीआयडीसह पुणे ग्रामीण आणि पुणे पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू होता. ऊरळी कांचन पोलिसांना लोंढे हा लोणी काळभोर आणि ऊरळी कांचन परिसरात लपून राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून गोपनीय पद्धतीने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लोंढेचा माग काढला असता त्याने पोलिसांच्या नजरेतून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला अखेर ताब्यात घेतले. पोलिसांच्या कारवाईमुळे विषारी गावठी दारू प्रकरणातील तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

या प्रकरणात आर्यन संजीव धोत्रे (वय २४) आणि कल्पेश अशोक अग्रवाल (वय २९) यांनाही मंगळवारी (ता. २५) अटक करण्यात आली असून, न्यायालयाने दोघांना १ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बाळू लोंढे याची या संपूर्ण प्रकरणातील भूमिका, विषारी दारूचा पुरवठा, त्याच्याशी संबंधित व्यक्ती आणि रॅकेटची संपूर्ण साखळी याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. लोंढेकडून मिळणाऱ्या माहितीतून फरार असलेल्या अन्य आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून केला जाणार आहे.

दरम्यान, पोलिसांची नजर चुकवण्यासाठी बाळू लोंढेने आपल्या पेहरावातही बदल केला होता. यापूर्वी दाढी-मिश्या वाढवून आणि कपाळावर टिळा लावून वावरणारा लोंढे फरार असताना दाढी-मिश्या काढून मळकट कपड्यांमध्ये वावरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अखेर त्याचा फरार होण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला असून, या कारवाईनंतर विषारी गावठी दारू प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध घेण्यास वेग येण्याची शक्यता आहे.

Total Visitors :
4767262
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *