जाकीर शेकासन यांचा आंदोलनाचा इशारा
संगमेश्वर : तालुक्याचे केंद्र असलेल्या देवरूख पंचायत समितीतील सुस्त आणि ढिसाळ प्रशासकीय पद्धतीमुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले असून, या विक्रमी गलिथान कारभाराची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी तीव्र उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्राथमिक आणि अत्यंत आवश्यक असलेला जन्मदाखला मिळवण्यासाठी नागरिकांना वर्षभरापासून कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. विविध तक्रारी आणि निवेदनांवर कोणताही तात्काळ निपटारा होत नसल्याने संगमेश्वर तालुक्यातील जनतेमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन गैरहजेरीमुळे तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली असून, दैनंदिन कामांच्या खोळंब्यामुळे गरीब जनतेला आर्थिक भुर्दंड आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये अधिकारी आणि ग्रामसेवक आठवड्यातून एकदाही हजर राहत नसल्याने कार्यालयांना कुलूप लागलेलेच दिसते. परिणामी जन्म, मृत्यू, रहिवासी दाखला आणि घरपट्टी पावती यांसारख्या अत्यावश्यक कामांसाठी सर्वसामान्यांना पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. एका जन्मदाखल्यासाठी अर्ज सादर करून तब्बल वर्ष उलटून गेले तरी तो मिळालेला नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध महत्त्वाच्या कामांसाठी जन्मदाखला आवश्यक असल्याने प्रशासनाच्या या संथ व बेजबाबदार कारभारामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
दाखल्यांव्यतिरिक्त नागरिकांनी मांडलेल्या इतर अडचणी व निवेदनांचीही साधी दखल घेतली जात नाही. त्रस्त नागरिक विचारणा करण्यास आल्यावर त्यांना ‘उद्या या, परवा या’ अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठवले जाते. यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचा रोजगार बुडत असून प्रवास खर्चाचा अतिरिक्त बोजा त्यांच्यावर पडत आहे. शासनाचा गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी कामावर गैरहजर राहून जनतेच्या पैशांचा थेट अपव्यय करत असल्याचा घणाघाती आरोप माजी पंचायत समिती सदस्य जाकीर शेकासन यांनी केला आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे या अनागोंदीवर कसलेही नियंत्रण राहिलेले नाही. येत्या आठ दिवसांत या कारभारात सुधारणा करून प्रलंबित दाखल्यांचे त्वरित वाटप न झाल्यास देवरूख पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेकासन यांनी दिला असून, ग्रामस्थांनी या आंदोलनाला भक्कम पाठिंबा जाहीर केला आहे.




