दोन दशकांची नगरसेवक म्हणून कारकीर्द; सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान
राजापूर (प्रतिनिधी) : राजापूर शहरातील मापारीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक आणि राजापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक अब्दुलरहिमान उर्फ कुतुबुद्दीन अ. अजिज मापारी (७८) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजापूर शहरासह तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
कुतुबुद्दीन मापारी यांनी राजापूरच्या सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ योगदान दिले. नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून त्यांनी सुमारे २० वर्षे जबाबदारी सांभाळली. या प्रदीर्घ कालावधीत आपल्या प्रभागातील नागरिकांच्या अडचणी, विविध नागरी समस्या तसेच शहरातील सार्वजनिक प्रश्न यांचा सातत्याने पाठपुरावा करण्यावर त्यांनी भर दिला. नागरिकांशी असलेला थेट संपर्क आणि आपुलकीच्या स्वभावामुळे ते सर्वसामान्यांमध्ये परिचित होते.
राजकारणाबरोबरच मापारी यांनी शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. शैक्षणिक संस्थांच्या कामकाजात तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपले योगदान दिले. याशिवाय जमातुल मुस्लिमीन वरचावाडा जमातीचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
कुतुबुद्दीन मापारी यांची ओळख शांत, संयमी आणि मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणून होती. शहरातील विविध समाजघटकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिकांशी त्यांचा असलेला स्नेह आणि सामाजिक सलोखा विशेष उल्लेखनीय होता. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे राजापूर शहराबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातही त्यांचा मोठा परिचय होता.
गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी रात्री अचानक प्रकृती अधिक खालावल्याने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात अशफाक व मकसूद हे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. सोमवारी सकाळी तालीमखाना कबरस्तान येथे त्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजापूरचे माजी नगरसेवक कुतुबुद्दीन मापारी यांचे निधन
Leave a Comment





