मोरोशी येथे स्वमालकीच्या जमिनीतील सागवानाची बेकायदेशीर वृक्षतोड; संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची राजापूर पोलिसांत तक्रार

Gramin Varta
86 Views

राजापूर: तालुक्यातील मोरोशी येथील स्वमालकीच्या जागेत विनापरवाना प्रवेश करून मौल्यवान सागवानाची झाडे बेकायदेशीररीत्या तोडून मोठे नुकसान केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नामदेव कृष्णा कानडे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून, संबंधित संशयितांवर तातडीने गुन्हा दाखल करून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची प्रत राजापूर पोलीस निरीक्षकांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरोशी गावातील स सर्व्हे नंबर व गट नंबर १४८/१४ आणि १४८/१५ या मिळकतीवर नामदेव कानडे यांच्या नावाची कायदेशीर नोंद आहे. या क्षेत्रात सुमारे ५७ सागवानाची झाडे असून, १८ ऑगस्ट २०२६ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शिवाजी नारायण कानडे व शिवानी शिवाजी कानडे यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता या जागेत घुसून सागवानाच्या झाडांची परस्पर तोड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. २५ ऑगस्ट रोजी कानडे हे स्वतःच्या घरातील विद्युत मीटरच्या कामासाठी गावात गेले असता, हा गैरप्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

आपल्या मालकीच्या मौल्यवान सागवान वृक्षांची तोड झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत कानडे यांनी पोलिसांकडे दाद मागितली आहे. संबंधित विभागाने घटनास्थळाची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करावी, विनापरवाना तोडण्यात आलेल्या झाडांचे योग्य मूल्यांकन करून त्याची संपूर्ण नुकसानभरपाई संबंधितांकडून वसूल करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असा आग्रही पवित्रा तक्रारदाराने घेतला आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4790102
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *