खडपोली पुलाचे काम अंतिम टप्प्यात; जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

Gramin Varta
39 Views

चिपळूण: परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या खडपोली येथील बहुप्रतिक्षित पुलाच्या बांधकामाने आता महत्त्वाचा टप्पा गाठला असून, येत्या जानेवारीपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्याचा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पावसाळ्यापूर्वीच पुलाच्या फाउंडेशन व सबस्ट्रक्चरची सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यंत्रणेला यश आले होते. त्यामुळे पुलाच्या नदीपात्रातील सहा पिअर, दोन्ही ॲबटमेंट आणि ३ स्पॅनसाठी आवश्यक असलेल्या १२ गर्डरचे लाँचिंग वेळेत पूर्ण झाले. सध्या पावसामुळे कामात काहीसा व्यत्यय येत असला, तरी नियोजनानुसार कामाला गती देत नदीतील तीनही स्पॅनवर डेक स्लॅब टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे.

पुलाच्या मुख्य बांधकामासोबतच दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्यांचे (ॲप्रोच रोड) कामही समांतरपणे हाती घेण्यात आले आहे. पुलाची मजबुती, सुरक्षितता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा या निकषांशी कोणतीही तडजोड न करता प्रेस्ट्रेसिंगसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कामाची उत्कृष्ट गुणवत्ता राखण्यावर भर दिला जात आहे. कोणत्याही प्रकारची घाई न करता प्रत्येक तांत्रिक प्रक्रियेला पुरेसा वेळ देऊन हे काम टप्प्याटप्प्याने पुढे नेले जात असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पुलाचे काम जानेवारीच्या डेडलाइनमध्ये मार्गी लावून नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Total Visitors :
4790014
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *