डेरवणमध्ये ४०वी ज्युनिअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप; राज्यभरातील ३१५० खेळाडूंचा विक्रमी सहभाग

Gramin Varta
35 Views

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे डेरवण क्रीडामय

चिपळूण : महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन आणि एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४०व्या ज्युनिअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला डेरवण येथे उत्साहात सुरुवात झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल ३१५० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविल्याने संपूर्ण वालावलकर रुग्णालय परिसर अक्षरशः क्रीडामय झाला आहे.
चार दिवस चालणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत १४, १६, १८ आणि २० वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध गटांमध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांतील खेळाडू सहभागी झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने खेळाडूंचा सहभाग ही रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी तसेच डेरवणच्या क्रीडा संस्कृतीसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकादमीने या भव्य स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडत ‘शिवधनुष्य’ लीलया पेलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्पर्धेसाठी आलेल्या हजारो खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे सरचिटणीस सतीश उचील, रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर, सचिव संदीप तावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर मैदानावर विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांना सुरुवात होताच खेळाडूंच्या उत्साहाला उधाण आले. राज्यातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमुळे डेरवणच्या क्रीडांगणावर दिवसभर चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्यभरातून आलेल्या ३१५० खेळाडूंसाठी मैदान परिसरातच उत्तम निवास आणि उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक तसेच पालकांनी आयोजकांच्या व्यवस्थापनाचे समाधानाने कौतुक केले.

विशेष म्हणजे, कोकणातील ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे पाहून राज्याच्या विविध भागांतून आलेल्या अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांनी आश्चर्य व्यक्त केले. ग्रामीण भागात अशा दर्जाच्या सुविधा उभारल्यामुळे स्थानिक तसेच राज्यस्तरीय खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

- Advertisement -

सकाळच्या सत्रात विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. त्यातील प्रमुख निकाल पुढीलप्रमाणे : हॅमर थ्रो (२० वर्षाखालील मुली) नंदिनी गायकवाड, अकोला (४४.७४ मी.), विधी सावंत, मुंबई उपनगर (४२.८७ मी.), सिद्धी पाटील, सांगली (३९.८२ मी.). हॅमर थ्रो (२० वर्षाखालील मुले) – विउनायक देसाई, सांगली (५५.०५ मी.), स्वराज जाधव, सातारा (४८.४५ मी.), अरमान अली, वाशीम (४३.११ मी). लांब उडी (१८ वर्षाखालील मुली) – स्वर जाधव, सोलापूर (५०२५ मी), श्रद्धा भामरे, मुंबई उपनगर (५०१९ मी), वेन्कता श्री, रेगड (५०१६ मी). ५००० मी. धावणे (२० वर्षाखालील मुले) कारण सरवदे, सांगली (१४:१९.४१ मी.) अभिनंदन सूर्यवंशी, सांगली (१४:५१.१० मी.) अनिल जाधव, जळगाव (१४:५१.७५ मी.). ३००० मी. धावणे (२० वर्षाखालील मुली) मानसी यादव, पुणे (१०:१५.३० मी.), प्रणाली पवार, सांगली (१०:२२.९७ मी.) संतोषी नराळे, सातारा (१०:५१.८४).

स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना प्रा. अनघा कुलकर्णी, प्रा. जयेश पटेकरी, प्रा. निखील फुटणकर , प्रा. मोनिका तेरेभाले आदी मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान करून गौरविण्यात आले.
चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील उदयोन्मुख अॅथलेटिक्सपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची मोठी संधी मिळाली आहे. डेरवणसारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय स्पर्धेचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी आयोजन झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या लौकिकात आणखी भर पडली आहे.

३६ जिल्ह्यांतील ३१५० खेळाडूंच्या सहभागामुळे डेरवणमध्ये सध्या स्पर्धेची रंगत शिगेला पोहोचली असून, पुढील सत्रांमध्ये आणखी चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने डेरवणला राज्याच्या क्रीडा नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Total Visitors :
4770853
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *