कोकणवासीयांचे स्वप्न अखेर साकार; CSMT-सावंतवाडी नियमित एक्स्प्रेस आजपासून सेवेत

Gramin Varta
404 Views

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; मुंबई–कोकण प्रवास अधिक सुलभ होणार

मुंबई : कोकणवासीय आणि चाकरमान्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळाले असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोडदरम्यानच्या बहुप्रतीक्षित नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. त्यामुळे मुंबई आणि कोकणदरम्यान नियमित रेल्वे प्रवासाचे नवे दालन खुले झाले आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

खासदार नारायणराव राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही नियमित रेल्वे सेवा सुरू झाल्याचे सांगण्यात आले. मुंबईत रोजगार, व्यवसाय आणि शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या कोकणवासीयांसह गणेशोत्सव, सण-समारंभ तसेच वर्षभर मुंबई–कोकण प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे. नियमित रेल्वे उपलब्ध झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करून अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

नवीन नियमित सेवा गाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि 15088 सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस या क्रमांकांनी दररोज धावणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर या गाडीला थांबे देण्यात आले आहेत.

या सेवेमुळे मुंबईपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडीपर्यंतच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः कोकणातील विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, पर्यटक आणि चाकरमानी यांच्यासाठी ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई आणि कोकणातील प्रमुख शहरांदरम्यान दळणवळण अधिक सक्षम होण्यासही या रेल्वे सेवेची मदत होणार आहे.

कोकणवासीयांनी अनेक वर्षे केलेल्या मागणीला अखेर रेल्वेची जोड मिळाल्याने नियमित CSMT–सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ हा कोकणच्या रेल्वे प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या सेवेमुळे मुंबई–कोकण प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4798846
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *