रत्नागिरी : गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी जंगलमय भागात घेऊन आलेल्या संशयितांनी पोलिसांची चाहूल लागताच वाहनाने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वाहन अडविल्यानंतर दोघांना पकडण्यात आले; मात्र पळून जाणाऱ्या संशयितांपैकी एकाने पोलिस कर्मचाऱ्याच्या गळ्यावर धारदार सुर्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी तालुक्यातील करबुडे फाटा ते फणसवळे मार्गावर गुरुवारी पहाटे घडली. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, अन्य दोघे अंधाराचा आणि झाडीझुडपांचा फायदा घेत पसार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी पहाटे सव्वा एकच्या सुमारास रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी करबुडे, वेतोशी, फणसवळे परिसरात सरकारी वाहनातून गस्तीवर होते. करबुडे फाटा ते फणसवळे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूच्या जंगलमय परिसरात पाहणी सुरू असताना एक टोयोटा इनोव्हा वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले. या वाहनाला एमएच-०८-एक्यू-९७९२ असा बनावट क्रमांक लावण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांची चाहूल लागताच वाहनातील संशयितांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न करताच संशयितांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावरच वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, वाहनाच्या पुढील चाकांमध्ये बेशुद्ध अवस्थेतील गोवंशीय जनावर अडकल्याने वाहन जागीच थांबले. त्यानंतर वाहनातील संशयितांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली.
पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी झडप घालत आरोपी मोहसीन बाब कुरेशी याला झटापटीनंतर पकडले, तर पोलिस पथकाने शहेनशाहा अब्दुल सत्तार शेख यालाही ताब्यात घेतले. मात्र, अन्य दोन संशयित अस्लम आणि देवा यांनी अंधाराचा व दाट झाडीझुडपांचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, पळून जाणाऱ्या संशयितांपैकी एकाला पोलिस कर्मचारी पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याने हातातील धारदार सुरा पोलिस कर्मचाऱ्याच्या गळ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. पोलिस आपले शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांना धाक दाखवून कर्तव्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या झटापटीत पोलिस कर्मचाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने या घटनेने पोलिस पथकातही खळबळ उडाली.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी संकेत बाळाराम महाडीक यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा रजि. क्र. १९४/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम १०९(१), १३२, ३३६(३), ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मोहसीन बाब कुरेशी आणि शहेनशाहा अब्दुल सत्तार शेख यांना अटक करण्यात आली असून, पसार झालेल्या अस्लम व देवा यांचा शोध सुरू आहे.
वेतोशी गोवंश हत्या प्रकरण : अंगावर गाडी घातली… पोलिसांच्या गळ्यावर धारदार सुर्याने वार करण्याचा प्रयत्न
Leave a Comment






