CET विद्यार्थ्यांचा गोपनीय डेटा लीक; ४ लाख ५९ हजार विद्यार्थ्यांच्या माहितीची चौकशी

Gramin Varta
31 Views

मुंबई : महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाशी संबंधित तब्बल ४ लाख ५९ हजार ४९३ विद्यार्थ्यांची वैयक्तिक व गोपनीय माहिती बाहेर लीक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या खासगी माहितीच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

सीईटी कक्षाच्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२६ रोजी नारायण शिंगारे यांनी विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. या तक्रारीनंतर सीईटी कक्षाने प्रकरणाची तातडीने दखल घेत आपल्या संगणक प्रणाली आणि संबंधित यंत्रणेची फॉरेन्सिक ऑडिट केली. या तांत्रिक तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांची माहिती बाहेर गेल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने पुढील कायदेशीर कार्यवाहीची तयारी सुरू केली.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी ४ सप्टेंबर रोजी सीईटी कक्षाला भेट देत अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या गोपनीय माहितीशी संबंधित हा प्रकार गंभीर असून, याप्रकरणी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर सीईटी कक्षाचे प्रशासकीय अधिकारी श्रीकांत मडावी यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात अधिकृत पत्र सादर केले आहे. विद्यार्थ्यांची माहिती लीक होण्यामागील नेमके कारण, त्यासाठी जबाबदार व्यक्ती तसेच डेटा कुठे आणि कशा पद्धतीने वापरला गेला, याचा तपास करून नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना सीईटी कक्षाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रकार असल्याने पोलिसांच्या तपासातून डेटा लीकचे नेमके कारण आणि त्यामागील जबाबदार घटक कोणते समोर येतात, याकडे आता विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4808059
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *