‘प्रिय आई-बाबांना पत्र…’: गोळप परिसरातील शाळांमध्ये अभिनव उपक्रम; १८५ विद्यार्थ्यांनी आंतर्देशीय पत्रांतून व्यक्त केल्या कृतज्ञतेच्या भावना

Gramin Varta
8 Views

रत्नागिरी (प्रतिनिधी): डिजिटल युगात हरवत चाललेली पत्रसंस्कृती पुन्हा जिवंत करत मुलांमध्ये कौटुंबिक कृतज्ञतेची भावना रुजवण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील गोळप परिसरातील आठ शाळांमध्ये ‘प्रिय आई-बाबांना पत्र…’ हा अनोखा आणि भावूक उपक्रम नुकताच राबविण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत परिसरातील प्राथमिक शाळांमधील तब्बल १८५ विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांविषयीच्या अंतस्थ भावना थेट आंतर्देशीय पत्रावर उतरवून आई-वडिलांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रोजच्या कष्टातून मुलांचे भविष्य घडवणाऱ्या आई-वडिलांना धन्यवाद म्हणण्याची जाणीव करून देण्यात आली. वाढदिवसाव्यतिरिक्त एरवी मुलांकडून पालकांप्रती अशी कृतज्ञता सहसा व्यक्त होत नसल्याची बाब समोर आल्यानंतर, विद्यार्थ्यांना आपल्या भावना प्रत्यक्ष पत्रात मांडण्याची प्रेरणा देण्यात आली. या संकल्पनेला सर्व शाळांमधील शिक्षकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवत मुलांकडून पत्रलेखन करून घेण्याची जबाबदारी स्वीकारली. विद्यार्थ्यांनी आंतर्देशीय पत्रांवर स्वतःचा घरचा पत्ता लिहून तयार केलेली ही पत्रे आता टपाल खात्यामार्फत थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पत्रलेखनाचा प्रत्यक्ष सराव, टपाल व्यवस्थेची माहिती आणि अक्षराची ओळख होण्यासोबतच पालकांनाही आपल्या पाल्यांच्या निष्पाप भावना समजून घेता येणार आहेत.

विशेष म्हणजे यापूर्वी राबविण्यात आलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांना घरी लावण्यासाठी भाजीपाल्याच्या बिया देण्यात आल्या होत्या. त्यातून मुलांनी स्वतःच्या हाताने भोपळा, भेंडी, वाली, पालक अशा भाज्या पिकवून शाळेच्या डब्यात आणल्याचा अनुभव उत्साहाने सांगितला. शेती आणि निसर्गाशी नाळ जोडणाऱ्या त्या यशस्वी प्रयोगापाठोपाठ आता भावनांची देवाणघेवाण करणाऱ्या या पत्रलेखन मोहिमेमुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Total Visitors :
4802275
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *