खेड: रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील महत्त्वाच्या रघुवीर घाटात गुरुवारी रात्री कोसळलेली भलीमोठी दरड अद्याप पूर्णपणे हटवण्यात यश आलेले नाही. रस्त्यावर अजस्र आकाराचे दगड आणि मातीचा मोठा ढीग साचल्यामुळे गेल्या २४ तासांपासून या घाटातील संपूर्ण वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. परिणामी, घाटमाथ्यापलीकडील सुमारे १५ ते २० गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी असलेला संपर्क थेट तुटला असून, परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गुरुवारी रात्री दरड कोसळली तेव्हा अकलपे-खेड मार्गावरील एसटी बस घाटात अडकून पडली होती. या बसमध्ये शालेय विद्यार्थी, महिला व इतर प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करत होते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी चालकाने अडकलेली ही बस खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा अकलपेच्या दिशेने माघारी पाठवून दिली. मात्र, हा मार्ग बंद झाल्याने घाटमाथ्यावरील ग्रामीण भागातून खेड शहरात शाळा, महाविद्यालय, नोकरी आणि विविध कामांसाठी येणाऱ्या स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड फटका बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जेसीबी, पोकलेन व कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, रस्त्यावर आलेले दगड प्रचंड आकाराचे असल्याने ते पोकलेनच्या साहाय्याने बाजूला करणे कठीण जात होते. यामुळे दिवसभर अथक प्रयत्न करूनही शुक्रवारी मार्ग खुला होऊ शकला नाही. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शनिवारी सकाळपासून ब्रेकर मशीनच्या साहाय्याने हे भलेमोठे दगड फोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दगड फोडून त्याचा ढिगारा बाजूला सारत रस्ता पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
शनिवारी सायंकाळपर्यंत रघुवीर घाट वाहतुकीसाठी खुला होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांमधील दळणवळणाच्या दृष्टीने हा घाट अत्यंत महत्त्वाचा असल्याने स्थानिक ग्रामस्थ, एसटी प्रवासी आणि वाहनचालकांची मोठी अडचण झाली असून, मार्ग कधी पूर्ववत होतो याकडे आता दोन्ही जिल्ह्यांतील प्रवाशांचे डोळे लागले आहेत.





