तुषार पाचलकर (राजापूर): पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सवात यंदा क्रीडा आणि मनोरंजनाची दुहेरी रंगत पाहायला मिळाली. ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक असलेली मुख्य दहीहंडी आणि विशेष आकर्षण ठरलेल्या रस्सीखेच स्पर्धेने उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचवला होता. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या रस्सीखेच स्पर्धेत अव्हेंजर्स तळवडे संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.
यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या ५१ हजारांच्या दहीहंडीसाठी नामांकित गोविंदा पथकांमध्ये थर रचण्याची जोरदार चुरस रंगली. यामध्ये शिवशक्ती महिला गोविंदा पथक, हनुमान प्रसन्न खडपेवाडी पथक, कालिका देवी गोविंदा पथक (भू, राजापूर) आणि मारुती प्रसन्न गोविंदा पथक (आंबेवाडी, राजापूर) यांनी सहभाग नोंदवला. या पथकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहा ते सात थर रचून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडत अखेर ५१ हजारांची दहीहंडी फोडण्याचा पराक्रम केला.
दहीहंडीसोबतच यंदा मंडळाने प्रथमच आयोजित केलेल्या भव्य रस्सीखेच स्पर्धेला पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत तब्बल वीस संघांनी सहभाग घेऊन आपले बाहुबळ दाखवून दिले. अटीतटीच्या झालेल्या लढतींमध्ये अव्हेंजर्स तळवडे संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या विजेत्या संघाला राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांच्या हस्ते चषक, सन्मानपत्र आणि रोख ७ हजार ७७७ रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत ए वन कृषी सेवा केंद्र (पाचल) संघाने द्वितीय क्रमांक (रोख ५,५५५ रुपये), तर पाचल गुरववाडी संघाने तृतीय क्रमांक (रोख ३,३३३ रुपये) पटकावला.
पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये सलोखा निर्माण करणे आणि युवकांमध्ये क्रीडाभावना व एकजूट वाढीस लावण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा पथकांची सलामी आणि ताकदीची परीक्षा पाहणाऱ्या रस्सीखेच स्पर्धेमुळे यंदाच्या पाचल दहीहंडी उत्सवाला पंचक्रोशीतून हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती लावून उत्सवाचा आनंद लुटला.





