जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी नीरज इनामदारची निवड

Gramin Varta
22 Views

सावर्डे विद्यालयाच्या बुद्धिबळपटूची चमकदार कामगिरी; चिपळूण येथील तालुकास्तरीय स्पर्धेत पटकावले यश

सावर्डे: क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य (पुणे) आणि जिल्हा क्रीडा कार्यालय (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बुद्धिबळपटू नीरज इनामदार याने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

या तालुकास्तरीय शालेय स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम विद्यालयाच्या १४ आणि १७ वर्षे वयोगटातील नऊ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. १७ वर्षे वयोगटात तालुक्यातील तब्बल ६३ खेळाडूंनी बुद्धिबळाच्या पटावर रणनीतीचे डावपेच लढवले. यामध्ये नीरज इनामदार याने अत्यंत संयमी व कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. त्याने एकूण सहा फेऱ्यांपैकी चार सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना मात दिली, तर दोन सामने बरोबरीत (ड्रॉ) सोडवत अजिंक्य राहत जिल्हास्तरावर दिमाखात प्रवेश केला.

स्पर्धेत सहभागी विद्यालयाच्या इतर विद्यार्थ्यांनीही चमकदार खेळ करत लक्ष वेधून घेतले. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांचे बहुमोल तांत्रिक मार्गदर्शन लाभले.

- Advertisement -

नीरजच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष प्रशांत निकम, युगांधारा निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, डॉ. इसाक खतीब, सचिव महेश महाडिक, ज्येष्ठ विश्वस्त तथा शालेय समिती चेअरमन शांताराम खानविलकर, मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण आणि पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. जिल्हास्तरावर सावर्डे विद्यालयाचा नावलौकिक उंचावणाऱ्या नीरजवर सध्या क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील फेरीसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Total Visitors :
4810944
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *