भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान, खेड आयोजित “नमो दहीहंडी उत्सव २०२६” उत्साहात संपन्न

Gramin Varta
278 Views

खेड :  भारतीय जनता पार्टी आणि राजवैभव प्रतिष्ठान, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘नमो दहीहंडी उत्सव-२०२६’ छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. लेझर लाईट, भव्य व्यासपीठ, गोविंदा पथकांचा थरारक खेळ आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून गेल्या २० वर्षांपासून खेडमध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही पारंपरिक उत्साह आणि तरुणाईचा जोश कायम ठेवत हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. दापोली, हर्णे, चिपळूण आणि खेड परिसरातील विविध गोविंदा पथकांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यंदाच्या ‘नमो दहीहंडी’ उत्सवात खेड तालुक्यातील पाच गोविंदा पथकांनी तब्बल आठ थरांची रचना करत उपस्थितांची मने जिंकली. हिंदूराज गोविंदा पथक, खेड, हिंदूराज गोविंदा पथक, दापोली, खेमनाथ गोविंदा पथक, सुसेरी-खारी, एकविरा गोविंदा पथक, कुंभारवाडा आणि आई खोंडेकरिन गोविंदा पथक, खोंडे या पथकांनी आठ थर रचत उत्कंठावर्धक खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांच्या या साहसी कामगिरीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

उत्सवाच्या निमित्ताने गोविंदा पथकांना विभागून रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि मानाची गदा देऊन गौरविण्यात आले. यावेळी ॲड. वैभव खेडेकर यांनी उपस्थित गोविंदा पथकातील गोविंदांना शुभेच्छा देत थरांवर थर रचून दहीहंडी उत्सवाची रंगत वाढवल्याबद्दल सर्व पथकांचे कौतुक केले.

दहीहंडी हा केवळ धार्मिक किंवा पारंपरिक उत्सव नसून सामाजिक एकोपा, सांघिक भावना आणि तरुणाईच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणारा सोहळा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. बालगोपालांचा उत्साह, गोविंदांचा जल्लोष आणि नागरिकांची मोठी उपस्थिती यामुळे उत्सवाला विशेष रंगत आली.

या कार्यक्रमाला भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, ज्येष्ठ नेते राजू रेडीज, खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, अल्पसंख्याक सेल खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्ष उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, शहर उपशहराध्यक्षा मिनल गुहागरकर, संभाजी देवकते, खेड शहर उपाध्यक्ष राहुल पाटणे, भाजपा प्रेरित रिक्षा सेल खेड तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, शहर चिटणीस अनिकेत पवार, स्वप्निल नरळकर, सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले यांच्यासह भाजपा, युवा मोर्चा आणि महिला मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारंपरिक संस्कृतीचा उत्साह, तरुणाईची ऊर्जा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे खेडमधील ‘नमो दहीहंडी उत्सव-२०२६’ यंदाही संस्मरणीय ठरला.

Total Visitors :
4820490
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *