गव्याच्या धडकेत गंभीर जखमी स्वप्नील पेडामकरची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी

Gramin Varta
425 Views

साडवली सह्याद्रीनगर परिसरावर शोककळा; मित्रमंडळाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

देवरूख : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील आंबव येथे गव्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या साडवली सह्याद्रीनगर येथील स्वप्नील पेडामकर (३७) या तरुणाची अखेर मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने साडवली सह्याद्रीनगर परिसरावर शोककळा पसरली असून, मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.

स्वप्नील पेडामकर हा शुक्रवारी सकाळी कामानिमित्त मोटारसायकलवरून देवरूखहून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. सकाळी साडेआठच्या सुमारास आंबव येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलातून अचानक गवा रस्त्यावर धावत आला. यावेळी मोटारसायकलची गव्याला जोरदार धडक झाली. या अपघातात स्वप्नील रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्यासह हात-पायांना गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी डेरवण येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न आणि तीन दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर निष्फळ ठरली.

स्वप्नीलच्या निधनाचे वृत्त समजताच साडवली सह्याद्रीनगर परिसरात शोककळा पसरली. विशेष म्हणजे, स्वप्नीलच्या उपचारासाठी सह्याद्रीनगर मित्रमंडळाने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करून त्यातून जमा झालेला निधी त्याच्या उपचारासाठी दिला होता. त्याच मित्रमंडळाच्या वतीने स्वप्नीलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

स्वप्नीलच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी नऊ वाजता साडवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी निधनाने पेडामकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitors :
4820395
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *