धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त संगमेश्वरात रक्तदान शिबिर; ३० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Gramin Varta
33 Views

संगमेश्वर (प्रतिनिधी) : धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना व युवासेनेच्या वतीने संगमेश्वर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या उपक्रमासाठी बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटल, डेरवण यांचे वैद्यकीय व तांत्रिक सहकार्य लाभले. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. अपघातग्रस्त, गंभीर आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया, प्रसूतीदरम्यान तसेच अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत असल्याने नागरिकांनी नियमितपणे रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिबिराला संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश केणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. दिघे यांच्या लोककल्याणकारी कार्याचा उल्लेख करताना त्यांच्या भावनांना उधाण आले.

कार्यक्रमाला संगमेश्वर तालुका सभापती शर्वरी वेल्ये, युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी, जिल्हा परिषद सदस्या माधवीताई गिते, पंचायत समिती सदस्य सुरेश माईन, सुहास मयंगडे, माजी सरपंच विवेक शेरे, सीमा कदम, विभागप्रमुख आतिष पाटणे, जामृतभाई अलजी यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

युवासेनेच्या माध्यमातून भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा सभापती शर्वरी वेल्ये यांनी व्यक्त केली. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या उपक्रमाचे संगमेश्वर तालुक्यातून कौतुक होत आहे.

Total Visitors :
4782088
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *