राज्यस्तरीय युथ आयकॉन स्पर्धेत वांद्रीचा प्रज्वल सनगरे राज्यात प्रथम; संगमेश्वर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Gramin Varta
141 Views

संगमेश्वर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ आणि ‘युथ आयकॉन’ उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील प्रज्वल सनगरे याने ‘युथ आयकॉन – देवेंद्र फडणवीस’ या विषयावर उत्कृष्ट चित्र साकारत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे संगमेश्वर तालुक्यासह वांद्री गावाचे नाव राज्याच्या पटलावर झळकले आहे.

नागपूर येथे १९ ऑगस्ट रोजी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील हजारो  विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये प्रज्वल सनगरे याने आपल्या कलाकृतीतून प्रभावी मांडणी करत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या कलागुणांची दखल घेत त्याला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा मान मिळाला.

या स्पर्धेच्या समारोप समारंभात २३ ऑगस्ट रोजी नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर विजेत्यांचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रज्वल सनगरे याचा विशेष सत्कार करण्यात आला. राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याला प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि ३५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रज्वलच्या या यशाने त्याच्या कुटुंबीयांसह वांद्री ग्रामस्थ आणि संगमेश्वर तालुक्यातील कला क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन होत आहे. ग्रामीण भागातून पुढे येत राज्यस्तरीय स्पर्धेत अव्वल स्थान मिळविणाऱ्या प्रज्वलने आपल्या कलेच्या जोरावर संगमेश्वर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, वांद्री गावाचे नावही अभिमानाने उंचावले आहे.

Total Visitors :
4764055
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *