संगमेश्वर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; देवरूखकडे जाण्यासाठी एसटीच्या दोन अतिरिक्त फेऱ्यांना मंजुरी

Gramin Varta
6 Views

संगमेश्वर: संगमेश्वर रेल्वेस्थानकावर उतरून देवरूखच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाने अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे रेल्वेने संगमेश्वर येथे येणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार असून, प्रवासाचा आर्थिक भारही हलका होणार आहे.

माळवाशी येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत यांनी १४ जुलै रोजी एसटी महामंडळ तसेच परिवहन मंत्र्यांकडे निवेदन सादर करून रेल्वेप्रवाशांसाठी अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी देवरूख आगाराला अतिरिक्त फेऱ्या तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

यापूर्वी देवरूख आगारामार्फत दुपारी दोन वाजता ‘रेल्वेस्थानक-संगमेश्वर-देवरूख’ अशी केवळ एकच बसफेरी उपलब्ध होती. रेल्वेने संगमेश्वर येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने या एकमेव फेरीत सर्व प्रवाशांची सोय होणे शक्य होत नव्हते. परिणामी अनेक प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. या परिस्थितीचा फायदा घेत काही खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांकडून ५०० ते १००० रुपयांपर्यंत भाडे आकारले जात असल्याने आर्थिक फटका बसत होता.

प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी आता करजुवे आणि माखजन येथून सुटणाऱ्या दोन फेऱ्या रेल्वेस्थानकापर्यंत चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी साडेअकरा वाजता तसेच दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या फेऱ्यांमुळे रेल्वेने संगमेश्वरला पोहोचणाऱ्या प्रवाशांना देवरूखसह परिसरातील गावांकडे जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे रेल्वेप्रवाशांची दीर्घकाळापासूनची गैरसोय दूर होण्यास मदत होणार असून, खासगी वाहतुकीच्या तुलनेत स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. अतिरिक्त बसफेऱ्यांना मंजुरी मिळाल्याने संगमेश्वर तालुक्यातील प्रवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitors :
4767025
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *