खेड (विशेष प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावरील खेड स्थानकावर मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला असून, धावत्या रत्नागिरी-वलसाड एक्स्प्रेसची जोराची धडक बसल्याने एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास ही गाडी स्थानकातून जात असताना हा अपघात झाला. या घटनेने रेल्वे स्थानक परिसर आणि प्रवाशांमध्ये काही काळ मोठी खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात खोपी येथील रहिवासी सखाराम लाड (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानकावर तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आले. भरणे नाका पुलाखाली २४ तास सेवेत सज्ज असलेली जगद्गुरु रामानंदचार्य श्री नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका घटनास्थळी वेगाने दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी जखमी सखाराम लाड यांना तत्काळ पुढील उपचारांसाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
ऐनवेळी वैद्यकीय उपचार मिळाल्याने जखमी वृद्धावर सध्या रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला आणि सखाराम लाड गाडीच्या धडकेत कसे आले, याबाबत रेल्वे प्रशासन तसेच संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास करून माहिती घेतली जात आहे.






