गुहागरमध्ये मध्यरात्री भीषण आग; बामणे कुटुंबीय थोडक्यात बचावले, घरातील लाखोंचे साहित्य खाक

Gramin Varta
159 Views

गुहागर: शहरातील खालचा पाट परिसरात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत संतोष बामणे यांचे राहते घर जळून खाक झाले असून, यात घरातील धान्यासह जीवनावश्यक साहित्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मात्र, समोरच बसलेल्या स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे दोन वृद्धांसह संपूर्ण बामणे कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनेच्या वेळी बामणे यांच्या घरासमोरील कानडे यांच्या घरासमोर काही तरुण मंडळी कॅरम खेळून गप्पा मारत बसली होती. त्यावेळी बामणे यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील पुढील भागातून धूर आणि आगीच्या ज्वाला निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न लावता या तरुणांनी बामणे कुटुंबीयांना तातडीने जागे करून दोन वृद्धांसह सर्वांना आगीच्या विळख्यातून सुरक्षित बाहेर काढले. घराचे छत लाकडी असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि ठिणग्या तळमजल्यापर्यंत पोहोचल्याने बघता बघता संपूर्ण घराला आगीने कवेत घेतले. यामध्ये घरातील तांदूळ, कडधान्य, डाळी, किराणामाल व इतर महत्त्वाचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच आरजीपीपीएल आणि कोकण एलएनजीच्या अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जवानांना ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मदतकार्यादरम्यान नगरसेवक राजेंद्र भागडे यांनी पाण्याची चोख व्यवस्था करून अग्निशमन दलाला मोलाचे सहकार्य केले. या दुर्घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा नीता मालप, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच सीआयएसएफचे जवान यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याची पाहणी केली. तरुणांच्या समयसूचकतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या आगीत बामणे कुटुंबाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

Total Visitors :
4830857
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *