पुणे: पुण्यातील गणेशोत्सवात सतत ७२ तास चालणाऱ्या मिरवणुका आणि कानठळ्या बसवणाऱ्या डीजे साउंड सिस्टीमवर पूर्ण बंदी आणण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. डीजेविरोधी आंदोलनादरम्यान एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना प्रत्यक्ष मारहाणीचा सामना करावा लागलेल्या बापट यांच्या समर्थनार्थ अनेक पुणेकर रस्त्यावर उतरले होते; तर बहुतांश राजकीय नेत्यांनीही पारंपरिक वाद्ये वाजवून सण साजरे करता येतात, गोंगाटाची गरज काय, असा सूर लावला होता. मात्र, आता याच लढ्यादरम्यान हिंदू धार्मिक परंपरा, भगवान श्री गणेश आणि धार्मिक श्रद्धेविषयी कथित आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्ये केल्याचा ठपका ठेवत बापट यांना मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. प्रदीप नाईक यांनी थेट कायदेशीर नोटीस बजावल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या बापट यांच्या मुलाखतीतील विधानांचा संदर्भ देत, ही वक्तव्ये हिंदू भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणारी असल्याचा दावा या कायदेशीर नोटीसद्वारे करण्यात आला आहे. नोटीस मिळाल्यापासून अवघ्या ४८ तासांच्या आत बापट यांनी याप्रकरणी लेखी स्पष्टीकरण सादर करावे आणि सर्व हिंदू भाविकांची जाहीर व बिनशर्त माफी मागावी, अशी सक्त मागणी करण्यात आली आहे. नमूद मुदतीत समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह इतर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
ध्वनीप्रदूषण, लाऊडस्पिकर, मिरवणुका अथवा सार्वजनिक उत्सवांबाबत कायदेशीर आणि सभ्य मार्गाने मत मांडण्याच्या अधिकाराला कोणताही आक्षेप नसल्याचे ॲड. नाईक यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कोट्यवधी भाविकांच्या आराध्य दैवतांचा आणि धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही पोहोचत नाही, असे नोटीसमध्ये ठामपणे नमूद करण्यात आले आहे. एका व्यक्तीच्या व्यक्त होण्याच्या अधिकाराचा गैरवापर इतरांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्यासाठी केला जाऊ शकत नाही, अशी भूमिका घेत आता या प्रकरणावरून कायदेशीर संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.






