गणेशभक्तांना बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा; सजावटीच्या साहित्याने दुकाने सजली, बाजारपेठेत खरेदीची लगबग
लांजा / अरबाज नेवरेकर : गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागताच लांजा शहरातील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणरायाच्या स्वागतासाठी आवश्यक पूजेचे व सजावटीचे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले असून, बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला गणेशभक्तांकडून वेग आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध दुकाने आकर्षक सजावटीच्या साहित्याने सजली आहेत. मखर, विद्युत रोषणाई, फुले, हार, पूजेचे साहित्य, अगरबत्ती, धूप, आरतीचे साहित्य तसेच घरगुती सजावटीच्या विविध वस्तू खरेदीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देण्याकडेही नागरिकांचा कल दिसून येत आहे.
दरम्यान, गणेशमूर्तींच्या आगमनाची गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असून, मूर्तिकारांकडूनही मूर्ती निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विविध आकार, आकर्षक रूप आणि पारंपरिक कलाकुसरीच्या गणेशमूर्ती तयार करण्यात येत आहेत. आपल्या पसंतीच्या गणेशमूर्तीची आगाऊ नोंदणी करण्यासाठी भक्तांकडून प्रतिसाद मिळत आहे.
लांजा शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही उत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. मंडप उभारणी, सजावट, विद्युत रोषणाई तसेच धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यात गणेशोत्सवाचे वातावरण हळूहळू रंगू लागले आहे.
गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतशी लांजा बाजारपेठेतील खरेदी-विक्रीची लगबग आणखी वाढण्याची शक्यता आहे. गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आणि उत्सवाच्या तयारीमुळे लांजा शहरात सध्या भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
गणेशोत्सवाच्या चाहुलीने लांजा बाजारपेठ सज्ज
Leave a Comment






