दापोली: पर्यावरण रक्षणाचा संदेश केवळ प्रचारापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवत जेसीआय दापोलीने ‘सस्टेनेबल सोल्युशन्स’ प्रकल्पांतर्गत शहराला प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल उचलले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या धामधुमीत बाजारपेठेतील खरेदी-विक्री प्रचंड वाढत असल्याने घातक प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. या समस्येवर पर्यावरणपूरक पर्याय देत ‘प्लास्टिकला नकार, कापडी पिशवीचा स्वीकार’ हा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी संस्थेने दापोली एस.टी. बसस्थानक आणि मुख्य बाजारपेठ परिसरातील भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते तसेच इतर छोट्या व्यावसायिकांना तब्बल १८०० हून अधिक कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले.
जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता यांनी जानेवारी २०२६ मधील आपल्या पदग्रहण सोहळ्यात वर्षभरासाठी ‘प्लास्टिक फ्री दापोली’ ही विशेष संकल्पना जाहीर केली होती. त्या संकल्पाचाच एक भाग म्हणून मागील सात-आठ महिन्यांत संस्थेने शहरात सातत्याने जनजागृती व प्रत्यक्ष कृतीवर भर देणारे विविधांगी उपक्रम राबवले आहेत. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात प्लास्टिकच्या बाटल्यांना सक्षम पर्याय म्हणून दापोली पोस्ट ऑफिस, एमएसईबी कार्यालय, विविध ऑटोरिक्षा चालक आणि दातार वृद्धाश्रमात १५० हून अधिक स्टील बॉटल्सचे वाटप करण्यात आले होते. याशिवाय, दापोली पंचायत समितीच्या सहकार्याने राबवलेली व्यापक स्वच्छता अभियाने आणि स्थानिक समुद्रकिनाऱ्यांवर घेतलेल्या बीच क्लीनिंग ॲक्टिव्हिटींद्वारे संस्थेने पर्यावरण संवर्धनाची प्रभावी चळवळ उभी केली. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जेसीआय इंडियाच्या झोन ११ कडूनही जेसीआय दापोलीच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
या कापडी पिशवी वितरण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता, सचिव जेसी रोशन वेदक यांच्यासह जेएफडी कुणाल मंडलीक, जेसी भूषण इस्वलकर, जेएफएम तेजस मेहता, जेसी एचजीएफ ऋषिकेश शेठ, जेसी एचजीएफ मयुरेश शेठ, जेसी प्रसाद दाभोळे, जेसी एचजीएफ अद्नान मुकादम, जेसी रोहन आंब्रे, जेसी ऋषिकेश तलाठी आणि जेसी एचजीएफ विनय शिगवण आदी पदाधिकारी व सदस्य प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले होते. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणमुक्तीसाठी प्रत्यक्ष बदल घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे दापोलीतील व्यापारी, स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक घटकांमधून मोठे स्वागत व कौतुक होत आहे.







