लांजा/ अरबाज नेवरेकर : मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने पुढे राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रायबर कारला वाकेड पुलावर मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ६.४५ वाजता हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच वाकेड पोलीस मदत केंद्राचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच जिजाऊ संस्थेची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, वॅगनआर (एमएच ४६ एपी १९७४) मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जात होती, तर ट्रायबर (एमएच ४८ बीएच ८५५१) मुंबईहून राजापूरच्या दिशेने येत होती. वाकेड पुलावर वॅगनआर चालकाचे पुढील ट्रायबरवरील नियंत्रण चुकल्याने वॅगनआरने ट्रायबरला मागून धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून वॅगनआरमधील ध्रुव जितेंद्र मापारी (वय १६, रा. वेरली सडे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याच्यासह ट्रायबरमधील उत्तम परशुराम मिस्त्री (वय ६१) आणि मंगला उत्तम मिस्त्री (वय ६०, दोघेही रा. कुंभवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हे तिघे जखमी झाले.
अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. जखमींपैकी दोघांना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढण्यात आल्याने वाकेड पुलावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
लांजा पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कदम, विष्णू मांजरेकर आणि सुयोग वाडकर यांनी घटनास्थळी दाखल होत आवश्यक कार्यवाही केली. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ब्रेकिंग : वाकेड पुलावर अपघात; वॅगनआरच्या धडकेत तिघे जखमी
Leave a Comment





