दिशा सालियन मृत्यू प्रकरण: वडिलांनी सीबीआयकडे दिला जबाब, सामूहिक सामूहिक बलात्काराचा दावा

Gramin Varta
66 Views

मुंबई : दिवंगत दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी त्यांचे वकील निलेश ओझा यांच्यासह गुरुवारी (११ सप्टेंबर) मुंबईतील बीकेसी येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयात उपस्थित राहून आपला जबाब नोंदवला. दुपारी सुमारे २ वाजता सीबीआय कार्यालयात पोहोचलेली ही प्रक्रिया सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाली.

जबाब नोंदवल्यानंतर सीबीआय कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना वकील निलेश ओझा यांनी गंभीर आरोप केले. त्यांच्या दाव्यानुसार, दिशा सालियन यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय असून, या प्रकरणाशी संबंधित असल्याचे मानले जाणाऱ्या व्यक्तींची नावे सतीश सालियन यांनी तपास यंत्रणेकडे दिली आहेत. या नावांमध्ये काही बड्या व्यक्तींचा समावेश असल्याचा दावाही ओझा यांनी केला. मात्र, या आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

दिशाच्या मृत्यूच्या सुरुवातीच्या तपासाबाबतही ओझा यांनी प्रश्न उपस्थित केले. प्रारंभी तपास करणाऱ्या काही पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रकरणातील महत्त्वाची माहिती दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये परस्पर संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला.

आपल्याकडे एका माजी पोलिस अधिकाऱ्याची कथित ‘एक्स्ट्रा-ज्युडिशियल कबुली’ असल्याचे ओझा यांनी सांगितले. या कथित कबुलीजबाबाच्या आधारे तपास पुढे गेल्यास आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, सतीश सालियन यांनी सीबीआयकडे प्रकरणाशी संबंधित तक्रारी, कागदपत्रे आणि उपलब्ध माहिती सादर केल्याचे सांगितले. या प्रकरणात ज्यांची भूमिका असल्याचा संशय आहे, त्यांच्याबाबतची माहिती तपास यंत्रणेला देण्यात आली असून योग्य वेळी संपूर्ण माहिती समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

८ जून २०२० रोजी मालाड परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेच्या १४ व्या मजल्यावरून पडून दिशा सालियन यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांनी तपास केल्यानंतर घातपात किंवा कटाचा पुरावा नसल्याचे सांगितले होते. मात्र, दिशाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत त्यांच्या वडिलांनी न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला आणि सीबीआय चौकशीची मागणी केली.

आता या प्रकरणात सीबीआयकडून नव्याने तपास सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सतीश सालियन यांनी नोंदवलेला जबाब आणि त्यांच्या वकिलांकडून करण्यात आलेले आरोप महत्त्वाचे ठरले आहेत. या आरोपांमागील तथ्य, कथित पुरावे आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार असून, सीबीआयच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4839634
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *