रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख असलेला नामफलक बदलण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्याची अखेर रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतली आहे. प्रशासनाने संबंधित नामफलकावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नामोल्लेख हटवून योग्य बदलाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. या निर्णयाचे मनसेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरातील एका नामफलकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन महाराष्ट्रात राजकारण करायचे आणि प्रसिद्धीच्या विषयात मात्र सोयीस्करपणे त्यांचा एकेरी उल्लेख करायचा, ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. संबंधित नामफलक येत्या महिनाभरात बदलण्यात आला नाही, तर मनसेकडून त्याचे योग्य ते नामकरण करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला होता.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाने अखेर या प्रकरणाची दखल घेत संबंधित नामफलकावरील एकेरी नामोल्लेख हटवला आहे. तमाम रत्नागिरीकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेला आदर आणि प्रेम लक्षात घेता प्रशासनाने घेतलेले हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे रुपेश जाधव यांनी म्हटले आहे. आगामी काळात शहरातील संबंधित ठिकाणी योग्य नामफलक तसेच नागरिकांसाठी आवश्यक असलेले निवारा शेडरूपी बसथांबे उभारले जातील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
याचबरोबर नगरपरिषद प्रशासनाने शहरातील सर्व बसथांब्यांच्या फलकांवर वंदनीय महापुरुषांचे योग्य पद्धतीने फोटो लावावेत, अशी मागणीही मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रत्नागिरीकरांनी चुकीच्या गोष्टींविरोधात तीव्र भावना व्यक्त करून त्याला विरोध केला आणि योग्य पायंडा पाडला, असे जाधव यांनी सांगितले.
शहरातील प्रश्न आणि नागरिकांच्या भावनांना प्रशासनाने यापुढेही गांभीर्याने घेऊन रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांनी व्यक्त केली आहे. नगरपरिषद प्रशासनाने मनसेच्या इशाऱ्याची दखल घेतल्याने या प्रकरणाला अखेर सकारात्मक वळण मिळाले आहे.
रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाने मनसेच्या इशाऱ्याची घेतली दखल; छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नामोल्लेख हटवला
Leave a Comment






