पर्ससीनच्या बेकायदा मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार संकटात

Gramin Varta
21 Views

जाळी फाटण्याच्या घटनांमुळे लाखोंचे नुकसान; छोट्या मच्छीमारांचा व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची भीती

रत्नागिरी : खोल समुद्रात ‘परसीन नेट’च्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदा मासेमारीमुळे पारंपरिक आणि छोट्या मच्छीमारांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. परसीनच्या जाळ्यांमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या लाखो रुपयांच्या जाळ्या फाटत असून, त्यांचा व्यवसायच धोक्यात येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांकडून करण्यात येत आहे. नियमांनुसार १२ सागरी मैलांच्या पुढे सध्या परसीन नेट मासेमारीला बंदी आहे. मात्र, काही परसीन नौका नियम धाब्यावर बसवून पारंपरिक मच्छीमार ज्या भागात मासेमारी करतात, त्याच ठिकाणी घुसखोरी करत असल्याचा आरोप आहे.

पारंपरिक मच्छीमारांनी रात्रंदिवस मेहनत करून टाकलेल्या जाळ्या मोठ्या नौकांच्या प्रोपेलरमध्ये अडकून फाटत आहेत. एका जाळ्याची किंमत साधारण ८० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत असल्याने जाळी फाटल्यास छोट्या मच्छीमारांवर मोठा आर्थिक बोजा पडतो. गेल्या काही दिवसांत अशा घटना वारंवार घडल्याने मच्छीमारांमध्ये चिंता वाढली आहे.

जाळी फाटण्याबरोबरच या प्रकारच्या मासेमारीमुळे माशांचे उत्पादन घटत असल्याचा दावा मच्छीमारांकडून करण्यात येत आहे. त्याचा थेट परिणाम पारंपरिक आणि छोट्या मच्छीमारांच्या उत्पन्नावर होत असून, आधीच अडचणीत असलेला हा व्यवसाय आणखी संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.

या प्रकाराला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. बेकायदा पद्धतीने मासेमारी करणाऱ्या परसीन नौकांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणीही पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे.

Total Visitors :
4840301
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *