मकरंद सुर्वे / संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा अचानक तोल गेल्याने त्याचा मागील भाग महामार्गावर आडवा झाला, तर इंजिनचा पुढील भाग उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रस्त्यावर उतरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्राथमिक माहितीनुसार, आरवली उड्डाणपुलाजवळ चालकाने ब्रेक लावताच कंटेनर घसरला आणि नियंत्रण सुटले. अवजड वाहन साईड वॉलवर आदळून आडवे झाल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची वेळ आली.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणांचा फरक पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा घटनास्थळी होती.
अपघातामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती. कंटेनर हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून, प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त कंटेनर रिकामा होता.
ब्रेकिंग : आरवलीत भीषण अपघात; कंटेनर लटकला डिव्हायडरवर
Leave a Comment
