गुहागरमध्ये एअरगनची निष्काळजीपणे हाताळणी; स्वतःच्याच गोळीबारात तरुण जखमी

Gramin Varta
232 Views

गुहागर: स्वतःच्या मालकीची एअरगन बेजबाबदारपणे हाताळणाऱ्या एका ४५ वर्षीय तरुणाला स्वतःच्याच चुकीचा फटका बसल्याची धक्कादायक घटना गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने निष्काळजीपणा केल्यामुळे स्वतःच्याच डाव्या खांद्याला दुखापत करून घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास अभिजीत अविनाश कदम हा आपल्या राहत्या घरी एअरगनची साफसफाई किंवा हाताळणी करत होता. या वेळी त्याने ही एअरगन अत्यंत बेदरकारपणे हाताळल्याने आणि निष्काळजीपणामुळे ट्रिगरवर बोट दाबले गेले.

यामुळे बंदुकीतून छरा फायर झाला आणि तो थेट त्याच्याच डाव्या खांद्याला लागला. या घटनेत अभिजीत कदम स्वतःच जखमी झाला असून, त्याच्या या कृत्यामुळे इतरांच्या जीविताला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश शंकर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुहागर पोलिसांनी आरोपी अभिजीत कदम याच्यावर भारतीय न्यायसंहिता आणि संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. स्वतःच्या बेजबाबदारपणामुळे ओढवलेल्या या अपघाताची परिसरात मोठी चर्चा असून, शस्त्रास्त्रे हाताळताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *